एकीचे कपडे फाडले, विवस्त्र केलं, दोघींचे जीव गेले, बुलढाण्यात 24 तासांत काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Buldhana News: राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचं जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात मागील २४ तासांत खळबळजनक घटना घडल्या आहेत.
बुलढाणा: राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचं जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात मागील २४ तासांत खळबळजनक घटना घडल्या आहेत. बुलढाण्यात एकाच दिवशी महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अल्पवयीन मुलीची हत्या, विवस्त्र अवस्थेत आढळलेले मृतदेह आणि विनयभंगाच्या प्रकरणांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मोताळा येथे १७ वर्षीय मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह
मोताळा तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता आढळला आहे. न्यायालयाच्या मागील नदीपात्रात विवस्त्र अवस्थेत हा मृतदेह आढळला आहे. ही पीडित मुलगी २० फेब्रुवारीपासून घरातून बेपत्ता होती. ती मतिमंद असल्याचे आणि मागील पाच वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत मिळाल्याने तिच्यावर अत्याचार करून घातपात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बोराखेडी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
advertisement
बुलढाण्याच्या मुलीची नाशिकमध्ये निर्घृण हत्या
दुसरीकडे, सिंदखेडराजा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीची नाशिक येथील सारूळ परिसरातील जंगलात हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या गळ्यात चाकू खुपसलेला होता आणि मृतदेहाजवळ पिझ्झाचे तुकडेही आढळले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासावरून दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी मृत मुलीचा प्रियकर होता. मात्र गेल्या काही काळापासून मुलीचं दुसऱ्या एका तरुणावर प्रेम जडलं होतं. त्यामुळे ती आरोपी तरुणाला इग्नोर करत होती. याचाच राग मनात धरून आरोपीनं आपल्या मित्राच्या मदतीने तरुणीची हत्या केली.
advertisement
चिखली येथे विनयभंगाचा प्रकार
चिखली तालुक्यातील काकड येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यास नकार देणाऱ्या एका महिलेसोबत जमावाने गैरवर्तन केलं आहे. आरोपींनी महिलेच्या अंगावरील कपडे फाडून त्यांचा विनयभंग केला आहे. या संतप्त घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात या महिलेच्या अंगावरील कपडे फाडल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
advertisement
मात्र एकाच दिवशी घडलेल्या या गंभीर घटनांमुळे बुलढाणा जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 9:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकीचे कपडे फाडले, विवस्त्र केलं, दोघींचे जीव गेले, बुलढाण्यात 24 तासांत काय घडलं?









