दुहेरी हत्याकांडाने बुलढाणा हादरलं! पोटच्या मुलाने आई-वडिलांची केली हत्या, मरेपर्यंत घातले घाव...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात एक अमानुष घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या आई वडिलांची निर्घृण हत्या केली आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात एक अमानुष घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या आई वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं लाकडी खाटेच्या दांड्याने जन्मदात्या आई वडिलांना बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भयावह होती की ज्यात आई आणि वडील अशा दोघांचाही मृत्यू झाला. निर्दयी मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांसोबत केलेल्या या अमानुष कृत्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
महादेव त्र्यंबक चोपडे आणि कौशल्याबाई महादेव चोपडे असं हत्या झालेल्या आई वडिलांची नावं आहेत. तर गणेश महादेव चोपडे असं आरोपी मुलाचं नावं आहे. मयत आई-वडिलांचे वय ७० ते ७५ वर्षांदरम्यान होते. आरोपी गणेश याने दोघांना लाकडी खाटेच्या दांड्याने बेदम मारहाण केली. चिखली तालुक्यातील किन्ही सवडद या गावात शनिवारी ही दुर्दैवी घटना घडली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश हा अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील किन्ही सवडद येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गणेशचा आपल्या आई-वडिलांसोबत जमिनीच्या व संपत्तीच्या हिस्सेवाटणीवरून सातत्याने वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी शनिवारी देखील याच कारणावरून गणेशने आपल्या आई वडिलांसोबत वाद घातला.
पण आई-वडिलांनी गणेशच्या संपत्तीतील वाटणीच्या मागणीला विरोध केला. त्यामुळे हा वाद आणखी वाढला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या गणेशने क्रूरतेची हद्द ओलांडली. त्याने घरात असलेल्या खाटेच्या दांड्याने आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना बेदम मारहाण केली. मारहाण इतकी गंभीर होती की दोघेही गंभीर जखमी झाले.
advertisement
शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन जखमी अवस्थेतील दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. हत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गणेश चोपडे याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे किन्ही सवडद गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
September 28, 2025 9:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
दुहेरी हत्याकांडाने बुलढाणा हादरलं! पोटच्या मुलाने आई-वडिलांची केली हत्या, मरेपर्यंत घातले घाव...