बुलढाण्यात दोन तरुणांमध्ये रक्तरंजित राडा, एकाने पोट चिरलं, दुसऱ्याने भोसकलं, चौकात घडला भयंकर प्रकार!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बुलढाण्यात दोन तरुणांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. राड्यात एका तरुणाने २७ वर्षीय दुसऱ्या युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: मागच्या काही दिवसांपासून बुलढाणा शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. असं असताना आता दोन तरुणांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. राड्यात एका तरुणाने २७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. या राड्यात हल्ला करणारा तरुण देखील जखमी झाला आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
शुभम राऊत असं हत्या झालेल्या २७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बुलढाणा शहरातील मच्छी लेआउट परिसरात वास्तव्याला होता. ऋषी जवरे असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. तोही या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या संगम चौकाजवळील पॅलेस चौकात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम राऊत आणि ऋषी जवरे या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, गांजा पिण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
advertisement
या भांडणाने काही वेळातच हिंसक रूप धारण केले. दोघांमध्ये धारदार शस्त्राने हाणामारी झाली. या झटापटीत शुभम राऊतच्या पोटात धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, या हल्ल्यात आरोपी ऋषी जवरे हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भरचौकात झालेल्या या खुनाच्या घटनेने बुलढाणा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अधिक तपास सुरू आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
September 23, 2025 1:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
बुलढाण्यात दोन तरुणांमध्ये रक्तरंजित राडा, एकाने पोट चिरलं, दुसऱ्याने भोसकलं, चौकात घडला भयंकर प्रकार!