जेवणाच्या ताटावर पाडला रक्ताचा सडा, कुऱ्हाडीने वार करत मुलाकडून वडिलांची हत्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने जेवणाच्या ताटावर आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने जेवणाच्या ताटावर आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं धारदार कुऱ्हाडीने वार करत वडिलांना संपवलं आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने वडिलांचा मृतदेह पोत्यात घालून नदीत फेकला आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्याची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
शिवाजी रामराव तेल्हारकर असं अटक केलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. तर रामराव तेल्हारकर असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे. आरोपी विवाहित असून तो आपल्या आई वडिलांसह संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावात राहतो. घटनेच्या दिवशी जेवण करत असताना त्याचा आपल्या वडिलांशी वाद झाला. यानंतर त्याने कुऱ्हाडीने वार करत वडिलांची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बोडखा येथील रामराव तेल्हारकर (मृतक) आणि त्यांचा मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर यांच्यात नेहमीच वाद होत असे. 'काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस,' अशा कारणांवरून त्यांच्यात वाद होत असे. घटनेच्या दिवशी, ताटात उष्टे अन्न ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून पुन्हा एकदा त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात शिवाजीने वडिलांवर कुऱ्हाडीने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली.
advertisement
हत्येनंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वडिलांचा मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीच्या पात्रात फेकून दिला. मृतकाची सून आणि आरोपीची पत्नी हिनेच पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे क्रूर कृत्य उघडकीस आले. तामगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शिवाजी तेल्हारकर याला अटक केली आहे. मात्र, घटनेतील मृतदेह अद्याप सापडलेला नाही, त्यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे आव्हान आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
August 22, 2025 8:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
जेवणाच्या ताटावर पाडला रक्ताचा सडा, कुऱ्हाडीने वार करत मुलाकडून वडिलांची हत्या