बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा प्रकोप वाढला, रुग्णांचा आकडा 139 वर, ICMR चेन्नईचं पथक करणार पाहणी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Takkal Virus in Buldhana News: मागील 15 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलं आहे. शेगाव तालुक्याच्या अकरा गावात याची साथ पसरली असून या गावातील अनेकांची केसगळती झाली आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: मागील 15 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलं आहे. शेगाव तालुक्याच्या अकरा गावात याची साथ पसरली असून या गावातील अनेकांची केसगळती झाली आहे. टक्कल पडणाऱ्या रुग्णांचा आकडा आता वाढतच चालला आहे. आतापर्यंत शेगाव तालुक्यातील अकरा गावांमध्ये एकूण 139 जणांचं टक्कल पडल्याचं समोर आलं आहे. संबंधितांवर उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची केसगळती नेमकी कशामुळे झाली, याचा थांगपत्ता अद्याप कुणालाच लागत नाहीये.
सुरुवातीला फंगल इन्फेक्शन किंवा पाण्यामुळे केस गळती होत असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. पुढे बुलढाण्यातील लोणार सरोवरातील पाणी पिण्याच्या पाण्यात झिरपल्याने हा प्रकार घडत असावा, अशा शक्यताही बांधण्यात आल्या. मात्र अजूनही या गावातील लोकांचं टक्कल कशामुळे पडत आहे, याचं निदान करता आलं नाही. केसगळती होत असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील अनेकांनी अंघोळ करणं देखील बंद केलं आहे. तरीही प्रशासनाकडून अद्याप ठोस पावलं उचलल्याच दिसत आहे.
advertisement
या घटनेला जवळपास 15 दिवस उलटल्यानंतर आता अखेर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल सायन्सेस अर्थात ICMR चं पथक बुलढाण्यात दाखल होणार आहे. दुपारी १२ वाजण्याच्या आसपास चेन्नई आणि दिल्ली ICMR चं पथक बुलढाण्यात येणार आहे. इथं येऊन ते पाण्याचे नमुने घेणार आहेत, शिवाय इथल्या लोकांची केसगळती नेमकी कशामुळे होतेय, या कारणाचा शोध घेणार आहेत. ICMR च्या तपासानंतर केसगळतीचं खरं कारण समोर येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
advertisement
पण या टक्कल व्हायरसची साथ आता आसपासच्या गावात पसरत आहे. हे नेमकं कशामुळे होतंय, हेच इथल्या नागरिकांना माहीत नसल्याने ही साथ रोखण्यासाठी काय काळजी घ्यायची, हेच इथल्या लोकांना माहीत नाही. सुरुवातीला डोक्याला खाज सुटणे आणि नंतर तीन दिवसातच केस गळून टक्कल पडत असल्याने येथील लोक दहशतीखाली जगत आहेत.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
January 13, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा प्रकोप वाढला, रुग्णांचा आकडा 139 वर, ICMR चेन्नईचं पथक करणार पाहणी


