OBC Reservation: मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण पण भुजबळ ऐकेना, ओबीसींसाठी नवा एल्गार, २ दिवसांत मोठं पाऊल!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Chhagan Bhujbal: नात्यातील, कुळातील वा गावातील ज्यांची कुणबी-मराठा, मराठा कुणबी नोंद असेल त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल, असा शासन निर्णय काढल्याने ओबीसी बांधवांमध्ये खदखद आहे. याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : सणासुदीचा काळ असल्याने वकील बांधवांशी चर्चा होण्यात अडथळे येत होते. परंतु आमची वकिलांशी चर्चा झालेली असून मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात आमच्या सगळ्याच संघटना एकवटल्या असून या शासन निर्णयाचा आम्हाला नक्कीच फटका बसणार नाही. हा शासन निर्णय आमच्यासाठी अडचणीचा असल्याने आम्ही न्यायालयाचे दरवाजे येत्या दोन ते तीन दिवसांत ठोठावणार आहोत, अशी घोषणा ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी केली. राज्य सरकारच्याच निर्णयाविरोधात छगन भुजबळ हे न्यायालयात जाणार असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय जारी केला. तसेच मराठा समाजाला जातीचे प्रमाण काढण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासंबंधीची पावले राज्य शासनाने उचलली. नात्यातील, कुळातील वा गावातील ज्यांची कुणबी-मराठा, मराठा कुणबी नोंद असेल त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल, असा शासन निर्णय काढल्याने ओबीसी बांधवांमध्ये खदखद आहे. याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
तो जीआर आमच्यासाठी अडचणीचाच, मुख्यमंत्र्यांनाही ठासून सांगितलं
शासनाने काढलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज बांधव उपोषण करताहेत, कुणाची आंदोलने सुरू आहेत. ओबीसीमध्ये ३७४ जाती आहेत, त्यामुळे ज्याच्या त्याच्या पद्धतीने आंदोलने सुरू आहेत. आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही आमच्या मार्गाने जात आहोत. सरकारमधील कुणीही काहीही सांगत असले तरी शासनाने जारी केलेल्या निर्णयाची शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची आहे. या शासन निर्णयाने कुणालाच त्रास होणार नाही, असे कुणीही म्हणत असले तरी आम्हाला त्रास होणार हे नक्की आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.
advertisement
कुणी म्हणतंय मराठ्यांचे प्रश्न सुटले, कुणी म्हणतंय ३ कोटी लोक ओबीसी होणार मग त्यांचे (जरांगे पाटील) म्हणणे खरे असेल तर सरकार सांगतेय हे खोटे आहे आणि सरकारचे म्हणणे खरे असेल तर तो माणूस खोटे बोलतोय. त्यामुळे खरे खोटे नक्की काय आहे, हे शोधणे गरजेचे असल्याचे सांगत एक दोन दिवसांत न्यायालयात जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
advertisement
ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता, छगन भुजबळ म्हणाले...
आंदोलनाबाबत ओबीसी नेत्यांमधील मतभिन्नतेविषयी विचारले असता, ओबीसीमध्ये ३७४ जाती आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी मते असणार आहे, पण ओबीसी आरक्षण कमी होता कामा नये, असेच प्रत्येकाचे मत आहे, अशे भुजबळ म्हणाले. जर आंदोलन करून जरांगे यांना हव्या तशा मागण्या मंजूर होणार असतील तर ओबीसी समाजही आंदोलन करेल, असेही भुजबळ म्हणाले.
advertisement
महाराष्ट्रात फिरू देणार नाही, जरांगेंचा इशारा, भुजबळ म्हणाले...
आरक्षणासंबंधी शासनाच्या निर्णयाविरोधात (जीआर) न्यायालयात जाणाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यावर विचारले असता, त्यांनी महाराष्ट्र विकत घेतला की काय देवालाच माहिती, सगळं राज्य त्याचेच आहे, अशी उपहात्मक टीका भुजबळ यांनी केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 4:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
OBC Reservation: मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण पण भुजबळ ऐकेना, ओबीसींसाठी नवा एल्गार, २ दिवसांत मोठं पाऊल!