प्रशासन ॲक्शन मोडवर, संभाजीनगरमध्ये हजारो जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द, नेमकं घडलं काय?
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Government Action : विलंबित जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांवर शासनाने कडक मोहीम हाती घेतली आहे. आधारच्या आधारे दिलेली अनेक प्रमाणपत्रे अवैध ठरण्याची शक्यता असून हजारो नोंदी रद्द होऊ शकतात. नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात विलंबित जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत झालेल्या गंभीर अनियमितता उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने कडक पावले उचलली आहेत. महसूल आणि वन विभागाने 1 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आधार कार्डला एकमेव पुरावा मानून किंवा नियमबाह्य पद्धतीने दिलेली सर्व विलंबित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे तत्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अशा प्रमाणपत्रांचे मूळ दस्तऐवज लाभार्थ्यांकडून परत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व विभागांचा एकदिवसीय समन्वय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्याआधी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, आरोग्य विभाग, महानगरपालिका व शासकीय रुग्णालयांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर उपविभागांतर्गत आतापर्यंत 47 प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असून 139 जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यभरात ही मोहीम राबविल्यास हजारो बनावट प्रमाणपत्रे रद्द होतील आणि त्याच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
advertisement
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
ज्या नागरिकांनी बेकायदा किंवा अपुऱ्या पुराव्यांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवले असेल, त्यांनी स्वतःहून संबंधित नोंदणी कार्यालयात (ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा शासकीय रुग्णालय) ते प्रमाणपत्र जमा करावे, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
शासनाच्या महत्त्वाच्या सूचना
1) आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही.
advertisement
2) आधार आणि जन्मतारखेत तफावत आढळल्यास तत्काळ एफआयआर दाखल करणे बंधनकारक.
3) रद्द केलेली प्रमाणपत्रे परत न दिल्यास पोलीस मदत घेण्याचे निर्देश.
4) प्रमाणपत्र घेऊन फरार झालेल्या व्यक्तींना फरार घोषित करण्याची कारवाई.
5) रद्द केलेल्या सर्व नोंदी सीआरएस पोर्टलवरून तात्काळ हटवाव्यात.
तपासात उघड झालेले गैरप्रकार
1) केवळ आधार कार्डच्या आधारे जन्म नोंदणी करून प्रमाणपत्रे देणे
advertisement
2) शाळा किंवा रुग्णालयाचे मूळ दाखले न घेता नोंदी करणे
3) उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश नसताना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रमाणपत्रे देणे
4) आधार क्रमांक आणि जन्मतारखेत मोठी तफावत असलेली प्रकरणे
संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक आकडेवारी
1)घाटी रुग्णालय कार्यक्षेत्र : 2173 नोंदी रद्द
2)5041 प्रकरणांची तपासणी प्रलंबित
advertisement
3)47 गुन्हे दाखल
4)139 प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2025 2:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
प्रशासन ॲक्शन मोडवर, संभाजीनगरमध्ये हजारो जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द, नेमकं घडलं काय?









