हनुमान जयंती 2026: 15 लाख भाविक येणार, भद्रा मारुतीचं दर्शन घेणार, खुलताबादला कशी सुरुये तयारी?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Hanuman Jayanti 2026: भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शन वेळ वाढवण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. खुलताबाद येथे राज्यातील एकमेव निद्रिस्त मारुती मंदिर आहे. याच भद्रा मारुती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 10 ते 15 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर संस्थान व प्रशासनाने व्यापक आणि नियोजनबद्ध तयारी केली आहे.
सध्या उन्हाळा तीव्र असल्याने भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मंदिरासमोर 150 बाय 200 फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. तसेच भाविकांसाठी आणखी पाच मंडपांची सोय करण्यात आली आहे. दर्शनासाठी पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र रांगा राहणार असून प्रवेश व निर्गमन मार्ग देखील ठेवण्यात आले आहेत. या रांगांचे बॅरिकेडिंगद्वारे शिस्तबद्ध व्यवस्थापन केले जाणार आहे.
advertisement
कसा असेल कार्यक्रम?
हनुमान जयंतीला पहाटे 4 वाजता महाअभिषेक, तर सकाळी 6 वाजता हनुमान जन्म महाआरती होणार आहे. सकाळी 7 ते 9 भक्तिसंगीत कार्यक्रम, तर 10 ते 12 या वेळेत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरसह विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक भद्रा मारुतीच्या दर्शनाला येतात. पायी दिंड्या, पालख्या व पताका घेऊन खुलताबादकडे येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. पायी येणाऱ्या भाविकांसाठी मार्गावर फराळ व पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
advertisement
महाप्रसादाचा लाभ
भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शन वेळ वाढवण्यात आली आहे. बुधवारी रात्री 12 वाजेपासून दर्शनास सुरुवात होणार असून गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार आहे. काल्याचे कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद वितरण सुरू होईल. हे वितरण संध्याकाळपर्यंत सुरू राहील. त्यामुळे लाखो भाविकांना याचा लाभ मिळणार आहे.
50 सीसीटीव्ही, सुरक्षेची तयारी
मंदिर परिसरात सुरक्षेची पुरेपूर तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या नेतृत्वाखाली 38 अधिकारी व 160 कर्मचारी तैनात आहेत. याशिवाय आरसीपीच्या दोन तुकड्या, बॉम्बशोधक पथक, 250 होमगार्ड व 50 खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 8:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
हनुमान जयंती 2026: 15 लाख भाविक येणार, भद्रा मारुतीचं दर्शन घेणार, खुलताबादला कशी सुरुये तयारी?








