वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं, 1600 मीटर धावताना संग्रामचा मृत्यू, छ. संभाजीनगरमधील घटना
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
खाकी वर्दी परिधान करून कुटुंबाचे नशीब बदलण्याचा निर्धार मनाशी बाळगून आलेल्या एका तरुणाचा स्वप्नांच्या मैदानावरच मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर : खाकी वर्दी परिधान करून कुटुंबाचे नशीब बदलण्याचा निर्धार मनाशी बाळगून आलेल्या एका तरुणाचा स्वप्नांच्या मैदानावरच मृत्यू झाला. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान 1600 मीटर धावण्याची शारीरिक चाचणी देताना 23 वर्षीय संग्राम धोंडीराम शिंदे याचा अचानक मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर ही घटना घडली आहे. घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.
सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेला संग्राम पोलीस दलात भरती होण्याच्या आशेने छत्रपती संभाजीनगर येथे आला होता. शनिवारी सकाळी सुमारे 8.15 वाजता 1600 मीटर धावण्याची चाचणी सुरू झाली. सुरुवातीला उत्साहाने धावणारा संग्राम काही अंतर पार करताच अचानक अस्वस्थ झाला आणि धावपट्टीवर कोसळला. मैदानावर उपस्थित पोलीस कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाने तत्काळ धाव घेत त्याला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
advertisement
संग्राम हा कष्टाळू आणि जिद्दी तरुण म्हणून ओळखला जात होता. वृद्ध आई-वडिलांना आधार देण्यासाठी आणि घरची परिस्थिती सुधारण्यासाठी तो अनेक महिन्यांपासून पहाटे उठून सराव करत होता. रोजच्या घामाघूम सरावातून त्याने स्वतःला घडवले होते. पण नियतीने त्याच्या स्वप्नांवर अचानक विराम दिला. त्याच्या निधनाची बातमी कळताच शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धावताना झालेला तीव्र शारीरिक ताण किंवा हृदयविकाराचा झटका ही शक्यता प्राथमिक स्तरावर व्यक्त केली जात आहे. अधिकृत कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
advertisement
या घटनेमुळे भरती प्रक्रियेला काही काळ स्थगिती देण्यात आली. आपल्या समोरच एका उमेदवाराचा जीव जाताना पाहिल्याने इतर तरुणांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर शारीरिक चाचणीपूर्वी स्वतःच्या प्रकृतीची तपासणी करूनच मैदानात उतरावे, तसेच अति ताण टाळावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 4:04 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं, 1600 मीटर धावताना संग्रामचा मृत्यू, छ. संभाजीनगरमधील घटना







