विधानसभेत 'पनवेल डान्सबार'चा मुद्दा, CM फडणवीसांचा थेट इशारा, माझ्याकडे तक्रारी आल्यात, आता...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राज्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा आणि डान्सबारविरुद्ध कारवाई करण्याचा मुद्दा विधानसभेत केला गेला.
मुंबई : वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा-बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात लवकरच दुरूस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. पनवेलमध्ये असणाऱ्या अनेक डान्सबारसंबंधी माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. जिकडे कुठे नियम भंग होत असेल तिकडे कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
राज्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा आणि डान्सबारविरुद्ध कारवाई करण्याचा मुद्दा सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार भास्कर जाधव यांनी सहभाग घेतला.
...तर त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले, ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली काही ठिकाणी डान्सबार चालवले जातात. अशा ठिकाणी कारवाई केल्यानंतरही पुन्हा त्याच प्रकारे व्यवसाय सुरू केला जातो. त्यामुळे राज्य शासनाने ठरवले आहे की तीन वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात करण्यात येईल. या अधिवेशनात किंवा पुढील अधिवेशनात यासंदर्भात आवश्यक दुरुस्ती प्रस्तावित केली जाईल, अशी महत्त्वाची त्यांनी दिली.
advertisement
पनवेल येथील प्रकरणाची तपासणी करण्यात येणार
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिले आहेत. राज्य शासनाने विविध वेळा कायदे आणि नियम तयार केले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या. तरीदेखील राज्य शासनाने नव्याने नियम आखले असून त्यानुसार ऑर्केस्ट्रा बार चालवण्यासाठी विशिष्ट जागा, पार्टिशन, अल्कोहोलवरील निर्बंध आदी अटी घालण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पनवेल येथील प्रकरणांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तेथील तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
advertisement
भास्कर जाधव यांनी विधानसभेत पनवेल डान्सबारची प्रकरणं सांगितली
विधानसभेत भास्कर जाधव यांनी पनवेलमधल्या डान्सबारच्या प्रकरणांचा उल्लेख करून नियम मोडणाऱ्या डान्सबारवर कठोर कारवाई करायची मागणी केली. ऑर्केस्ट्रा नाही लेडीज डान्स बार चालतात, मंत्री महोदय रात्री पनवेलला जा अन् डान्सबार बघा, असे शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले. त्यांची ही मागणी सगळ्या विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही उचलून धरली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 9:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विधानसभेत 'पनवेल डान्सबार'चा मुद्दा, CM फडणवीसांचा थेट इशारा, माझ्याकडे तक्रारी आल्यात, आता...








