लोकसभेला बंडखोर नेत्याला मदत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी मागितली ठाकरे गटाची माफी
- Published by:Suraj
Last Updated:
सांगलीत काँग्रेस उमेदवाराच्या सभेत बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लोकसभेच्या बंडखोरीवरून ठाकरे गटाची माफी मागितली.
सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर सांगलीत विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीत बंडखोरीमुळे चर्चा सुरू आहे. लोकसभेला काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यांनी ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीत सांगलीत वसंतदादा पाटील घराण्यातील सदस्याने अपक्ष अर्ज दाखल केलाय. सांगलीत काँग्रेस उमेदवाराच्या सभेत बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लोकसभेच्या बंडखोरीवरून ठाकरे गटाची माफी मागितली. काँग्रेसने मदत केल्यानंतर विशाल पाटील खासदार झाले असंही थोरात यांनी म्हटलं. ते काँग्रेसचे सांगलीतील उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, लोकसभेची निवडणूक झाली, या लोकसभेत काही नाही तरी आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटलांना झालीय हे नाकारता येणार नाही.आपल्या सगळ्यांची मदत झाल्याशिवाय ते खासदार होऊ शकले नाहीत.
विशाल पाटलांच्या विजयात वसंतदादा पाटलांची पुण्याईसुद्धा कामी आली. शिवसेनेचे इथे बसले आहेत. तुम्ही आम्हाला माफ करा. सगळ्यांच्याच मदतीनं विशाल पाटील खासदार झालेत हे नाकारता येणार नाही. ते खासदार झाले ही चांगली गोष्ट आहे असंही थोरात यांनी म्हटलं.
advertisement
विधानसभेची निवडणूक आली तेव्हा माझ्यासमोर प्रश्न होता. एकीकडे जयश्री पाटील आणि दुसरीकडे मदन पाटलांचे कुटुंबिय. ते कुटुंबसुद्धा जवळचं होतं. पृथ्वीराज बाबासुद्धा जवळचे होते. असा परिस्थितीत निर्णय घेणं कठीण होतं, पक्षालाच हा निर्णय कठीण होता असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
पृथ्वीराज पाटील यांनी दहा वर्षे सातत्यानं कष्ट केलं, धडपड केली. सर्वेक्षणाच्या आधारावर त्यांना उमेदवारी दिली. याचं स्वागत करून जयश्री पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता. आम्ही त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊ असं ठरलेलं. त्यांना बंड करायला नको होतं असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2024 12:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लोकसभेला बंडखोर नेत्याला मदत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी मागितली ठाकरे गटाची माफी