Dhananjay Munde: मुख्यमंत्री आमच्यासाठी कामधेनू, धनंजय मुंडेंच्या परळीतील 'त्या' वक्तव्याने राजकरणात खळबळ
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमच्या मनातील इच्छा माहित आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले.
बीड: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख कामधेनू असा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परळी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने महा पशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री हे आमच्या आमच्यासाठी कामधेनू आहेत , असे धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी स्वागत भाषणात मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांचं जोरदार कौतुक केलं.
देवाभाऊ आमच्या दृष्टीने तुम्हीच कामधेनू आहात... म्हणजे आमच्या इच्छा पूर्ण करणारे. परळी तीर्थक्षेत्र विकासासाठी अर्थ संकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करावी. परळीचा जिर्णोध्दार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्याला भरीव निधी द्यावा. सभागृहात दिलेला शब्द, थर्मल पॉवरच्या जागेवर सोलार प्रकल्प सुरू झाला आहे. देवाभाऊने यात पूर्ण लक्ष घातलं असून, तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू व्हावा तसेच पंचम द्वादश ज्योतिर्लिंग केंद्रीय प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा आणि प्रस्ताव तयार करण्यासाठी पाच कोटीचा निधी द्यावा. तसंच 11 पैकी नऊ प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्धता आहे. तसं प्रमाणपत्र आहे. प्रकल्प पाण्याची व्यवस्था करावी. आपण जलसंपदा मंत्री आहात, ती मागणी पूर्ण करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
advertisement
राजकीय वर्तुळात चर्चा
मुख्यमंत्री हे राज्यासाठी आणि आमच्यासाठी कामधेनू आहेत. आमच्या परळीच्या विकासासाठी जो काही निधी लागणार आहे तो ते देतीलच असे म्हणत वेगवेगळ्या कामांची यादी सादर करत निधी देण्याची मागणी केली. याबरोबरच भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्री हे कामधेनू आहेत त्यामुळे त्यांना आमच्या मनातील इच्छा माहित आहेत. त्यामुळे जास्त बोलत नाही असे म्हटल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंंडेंची ती इच्छा पूर्ण करणार का?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर आणि अमानवीय हत्येने संपूर्ण राज्य हादरले. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी जनसामान्यांतील आक्रोश आणि संतोष कायम आहे. याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक अण्णा कराड सध्या तुरुंगात आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला न्यायप्रविष्ठ आहे. धन्नुभाऊंना मोठ्या दबावानंतर मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले. त्यांनी आजारपणाचं कारण त्यासाठी पुढे केलं होते. गेल्या काही दिवसात धनंजय मुंडे मंत्रिपद पुन्हा मिळावे, यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मनातील ती नेमकी इच्छा कोणती आणि ती इच्छा जर मंत्रिपदाची असेल तर ती मुख्यमंत्री आता पूर्ण करणार का? यावर देखील चर्चा रंगू लागली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 7:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhananjay Munde: मुख्यमंत्री आमच्यासाठी कामधेनू, धनंजय मुंडेंच्या परळीतील 'त्या' वक्तव्याने राजकरणात खळबळ








