Maharashtra politics : अर्चना पाटलांना क्लीन चीट तर ओमराजेंना धक्का; धाराशिवमधून मोठी बातमी समोर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
धाराशिवमधून मोठी बातमी समोर येत आहे. अर्चना पाटील यांना क्लीन चीट मिळाली आहे.
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : धाराशिवमधून मोठी बातमी समोर येत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सायबर विभागाकडून त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना पैसे देऊन गर्दी जमावल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. त्यांनी आपल्या तक्रारीसोबत चार व्हिडीओ देखील सादर केले होते.
त्यानंतर या प्रकरणात सायबर विभागानं तपास सुरू केला. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले ते व्हिडीओ खोटे अर्थात इडिटेड असल्याचं सायबर विभागाच्या तपासात समोर आलं आहे. त्यानंतर सायबर पोलीस विभागानं आपला लेखी अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे सादर केला आहे.
तांत्रिक तपासणीत हे व्हिडीओ खोटे असल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओमधील भाषा स्क्रिपटेड व बॅकग्राउंड ब्लर असल्याने लोकेशन सांगणे कठीण असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित लोकांचे जबाब नोंदविण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन्ही उमेदवारांकडून परस्परांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
advertisement
धाराशिवमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीच्या वतीनं अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच अर्चना पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना धाराशिवचं तिकीट देण्यात आलं. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अर्चना पाटील अशी हाय होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
April 27, 2024 8:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Maharashtra politics : अर्चना पाटलांना क्लीन चीट तर ओमराजेंना धक्का; धाराशिवमधून मोठी बातमी समोर