अपमान जिव्हारी लागला, बीडमध्ये तरुणाने आयुष्याचा केला भयावह शेवट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सावकारी जाचाला आणि घरच्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून धारूर तालुक्यातील गावंदरा येथील एका २२ वर्षीय तरुणाने जीवन संपवलं आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड : सावकारी जाचाला आणि घरच्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून धारूर तालुक्यातील गावंदरा येथील एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धर्मराज बडे असं मृत तरुणाचं नाव असून, या प्रकरणी सावकार पती-पत्नीसह तिघांवर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराज बडे यांनी आरोपी बाळासाहेब कांबळे याच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी कांबळे सातत्याने तगादा लावत होता. पैसे मागण्याच्या बहाण्याने कांबळे हा धर्मराज यांच्या घरी गेला. तिथे त्याने केवळ पैशांची मागणीच केली नाही, तर धर्मराज यांच्या कुटुंबीयांविषयी अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद शब्दांचा वापर केला. या मानसिक त्रासामुळे आणि अपमानामुळे व्यथित होऊन धर्मराज यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
advertisement
पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांचे आंदोलन
धर्मराजच्या आत्महत्येनंतर गावकरी आणि नातेवाईक आक्रमक झाले. जोपर्यंत दोषी सावकारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. नातेवाईकांनी धर्मराजचा मृतदेह थेट दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर आणून ठिय्या आंदोलन केलं. जवळपास ४ ते ५ तास हे आंदोलन सुरू होतं, ज्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
advertisement
तीन आरोपींवर गुन्हा दाखल
पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुख्य आरोपी बाळासाहेब कांबळे, कांताबाई कांबळे आणि भागवत वेताळ या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकारणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतरच नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 9:05 AM IST








