सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, १७ हजार घरांची लॉटरी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी सिडकोने जे दर निश्चित केले होते त्यामध्ये थेट १० टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुंबई : पनवेल, नवी मुंबई परिसरात सिडकोमार्फत बांधण्यात येणाऱ्या घरांची किंमत १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सिडकोच्या घरांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करत असल्याची घोषणा केली.
भाजप आमदार विक्रांत पाटील तसेच इतरही लोकप्रतिनिधींनी सिडकोच्या घरांच्या किंमतीवरून आंदोलने केली होती. सिडकोच्या घरांच्या किंमती कमी केल्या जाव्यात अशी मुंबईकरांची मागणी होती. अखेर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतला.
नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न अधिक सुकर
नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी सिडकोने जे दर निश्चित केले होते त्यामध्ये थेट १० टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार असून नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे.
advertisement
नवी मुंबईत १७ हजार घरे बांधण्यात आली आहेत, लवकरच लॉटरी
सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या परिसरात तब्बल १७ हजार घरे बांधण्यात आली आहेत. या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. त्यापूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. इडब्ल्यूएस आणि एलआयजी या प्रवर्गातील घरांच्या किमती १० टक्के कमी होतील.
advertisement
सर्वांसाठी घरे या संकल्पनेला बळ देण्यासाठी निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अधिकृत आणि चांगल्या दर्जाची घरे मिळणे शक्य होणार आहेत, असे शिंदे म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 6:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, १७ हजार घरांची लॉटरी











