नकोशी! चौथी मुलगी नको म्हणून बापाने घेतला लेकीचा जीव, जामनेर हादरलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
तब्बल दीड महिन्यांनंतर सखोल तपासाअंती सत्य समोर आले आहे, या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोराड गावात चौथी मुलगी झाल्याच्या रागातून पित्यानेच तीन दिवसांच्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली होती. या धक्कादायक घटनेने जळगाव हादरला असून, याप्रकरणी निर्दयी बापाविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल दीड महिन्यांनंतर सखोल तपासाअंती सत्य समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा लालचंद राठोड याच्या पत्नीने तीन दिवसांपूर्वी एका चिमुकलीला जन्म दिला होता. मात्र ही चौथी मुलगी असल्याने कृष्णा राठोड नाराज होता. सुरुवातीला कुटुंबीयांनी आंघोळ करताना मुलगी पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यानुसार पहूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. चिमुकलेला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता. दीड महिन्यांनी वैद्यकीय अहवालात मुलीचा मृत्यू अपघाती नसून ठणक वस्तूच्या मारामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला.
advertisement
समाजमन सुन्न
तपासादरम्यान कृष्णा लालचंद राठोड या पित्यानेच चौथी मुलगी झाल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पहूर पोलिसांनी कृष्णा राठोड याला अटक करून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून समाजमन सुन्न झाले आहे.
संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि हळहळ
advertisement
या अमानवी घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. स्त्रीभ्रूण हत्या, मुलींविषयी असलेली मानसिकता आणि सामाजिक अज्ञान पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, समाजमन सुन्न करणारी ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 4:27 PM IST










