मुलाचं पिंडदान करताना घडला अनर्थ, आईसह तिघींचा करुण अंत, घाटावर काळीज चिरणारा आक्रोश
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
गोंदिया तालुक्यातील कोरणी घाटावर मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं मुलाचं पिंडदान करण्यासाठी गेलेल्या आईसह दोन मावस बहिणींचा करुण अंत झाला आहे.
गोंदिया: गोंदिया तालुक्यातील कोरणी घाटावर मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं मुलाचं पिंडदान करण्यासाठी गेलेल्या आईसह दोन मावस बहिणींचा करुण अंत झाला आहे. एकाच वेळी नात्यातील तीन महिलांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मीरा ईसुलाल तुरकर (५५), मीनाक्षी संतोष बघेले (३६) व स्मिता शत्रुघ्न टेंभरे (३९, तिघीही रा. नागपूर) अशी मृत पावलेल्या महिलांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मीरा ईसुलाल तुरकर यांचा मुलगा मुकेश तुरकर याचं ३० मे २०२५ रोजी आजाराने निधन झालं. त्याच्या पिंडदानासाठी गोंदिया तालुक्याच्या कोरणी घाटावर रविवारी दुपारी २० ते २५ लोक आले होते. दुपारी १२.३० वाजता पूजा करण्यापूर्वी आंघोळीसाठी महिला मंडळी घाटात उतरल्या. यावेळी मुकेशची वहिनी गायत्री राजेश तुरकर या आंघोळ करत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या.
advertisement
त्यांना पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या. हा प्रकार पाहून मीनाक्षी बघेले त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावल्या आणि त्यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु त्याही बडाल्या. दोघीही बुडत असल्याचे पाहून स्मिता टेंभरे यांनीही पाण्यात उडी घेतली. परंतु त्यादेखील पाण्यात बुडाल्या. तिघी बुडत असल्याचे पाहून मीरा ईसुलाल तुरकर यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असताना या प्रयत्नात त्यादेखील स्वतःचा जीव गमावून बसल्या.
advertisement
हा सगळा प्रकार घाटावरील एका लहान मुलाने पाहिला. त्याने तातडीने आरडाओरड करून नातेवाईकांना बोलावलं. यावेळी घाटावरील एका तरुणाने पाण्यात उडी मारून मुकेशची वहिनी गायत्री यांना बाहेर काढलं. त्यांचा जीव वाचला. मात्र गायत्री यांना वाचवायला गेलेल्या तिन्ही महिलांचा मात्र मृत्यू झाला. मुलाचं पिंडदान करायला गेल्यानंतर घडलेला हा प्रकार पाहून कुटुंबीयांनी आक्रोश केला. याप्रकरणी पोलीसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
June 09, 2025 7:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलाचं पिंडदान करताना घडला अनर्थ, आईसह तिघींचा करुण अंत, घाटावर काळीज चिरणारा आक्रोश