वय वर्ष 15, आई-वडिलांनी ठरवलं लग्न, मुलीनं केलं असं, प्रशासनाची पळापळ, ZP शाळेत काय घडलं?
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Child Marriage: 15 वर्षीय मुलीने समाजाची आणि घरच्यांची पर्वा न करता, स्वतःचे भविष्य वाचवण्यासाठी जे पाऊल उचलले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हिंगोली: केवळ 15 वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या समजूतदारपणाने आणि धाडसाने स्वतःचा बालविवाह टाळला आहे. घरातील मंडळींनी तिचा 25 वर्षांच्या तरुणासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आपल्याला पुढे खूप शिकायचे आहे. अजून आपलं लग्नाचं वय नाही? असा विचार तिच्या मनात आला आणि तिने थेट शाळेच्या मुख्याध्यापकांकडेच लेखी तक्रार केली. हिंगोलीतील एका जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या या मुलीच्या धाडसाचं आता कौतुक होतंय.
'माझे वय अवघे 15 वर्षे आहे, पण घरच्यांनी माझं लग्न 25 वर्षांच्या तरुणासोबत ठरवलंय. मला आता लग्न करायचं नाही, मला खूप शिकायचंय!' काळजाचा थरकाप उडवणारी ही आर्त साद वसमत तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत उमटली. स्वतःचे लग्न मोडण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने थेट मुख्याध्यापकांकडे लेखी विनंती केली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.
advertisement
विद्यार्थिनीच्या विनंती अर्जाची गांभीर्याने दखल घेत मुख्याध्यापकांनी तत्काळ पावले उचलली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामविकास अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि लग्न रोखण्यासाठी लेखी पत्रही देण्यात आले.
या पत्राची दखल घेऊन आता ग्रामपंचायत स्तरावर बालविवाह रोखण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे. सहसा ग्रामीण भागात बालविवाहासारख्या प्रथांविरुद्ध बोलण्यास मुली धजावत नाहीत. मात्र, या 15 वर्षीय मुलीने समाजाची आणि घरच्यांची पर्वा न करता, स्वतःचे भविष्य वाचवण्यासाठी जे पाऊल उचलले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 'शिक्षण हा माझा हक्क आहे,' हा संदेश तिने आपल्या कृतीतून दिला आहे.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 12:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
वय वर्ष 15, आई-वडिलांनी ठरवलं लग्न, मुलीनं केलं असं, प्रशासनाची पळापळ, ZP शाळेत काय घडलं?










