Navratri 2025: तेजस्वी रुप आणि सरोवराचं सानिध्य, लोणारमधील देवीचं श्री रामांनीही घेतलं होतं दर्शन
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Navratri 2025: हेमाडपंथी शैलीत बांधकाम असलेल्या या मंदिराच्या पायरीपर्यंत सरोवराचं पाणी आलेलं आहे.
बुलढाणा: निसर्गाच्या सानिध्यातच देवाचे स्थान असते, असं म्हणतात. महाराष्ट्रातील बहुतांश देवस्थानांना नयनरम्य निसर्गाचं सानिध्य लाभलेलं आहे. काही देवस्थानं निसर्ग सौंदर्यामुळेच जास्त प्रसिद्ध आहेत. बुलढाण्यातील 'कमळजा माता' हे मंदिर देखील असंच आहे. याठिकाणी नवरात्रीमध्ये भाविकांची विशेष गर्दी होते.
बुलढाणा जिल्ह्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे. लोणार सरोवर हे सुमारे 52,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. उल्कापातामुळे बेसॉल्ट खडकात निर्माण झालेले हे जगातील एकमेव सरोवर आहे. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. या सरोवराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी अनेक देवदेवतांची प्राचीन मंदिरं आहेत. 'कमळजा माता' हे त्यापैकीच एक मंदिर आहे.
advertisement
लोणार शहराची ग्रामदेवता म्हणून या देवीची ख्याती आहे. नवरात्रीचे 9 दिवस या ठिकाणी देवीचा मोठा उत्सव असतो. असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. देवीचं मंदिर अतिशय प्राचीन आहे. कमळजा माता ही देवी म्हणजे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या माहूरच्या देवीचं ठाणं आहे, असं म्हटलं जातं. हेमाडपंथी शैलीत बांधकाम असलेल्या या मंदिराच्या पायरीपर्यंत सरोवराचं पाणी आलेलं आहे. सरोवराच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे पहिल्यांदाच मंदिराच्या पायरीला पाणी लागल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
advertisement
कमळजा देवीची मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. मूर्ती समोर एक यज्ञकुंड आहे. असं म्हटलं जातं की, या ठिकाणी अनेक योगीपुरुषांनी तपश्चर्या करून सिद्धी मिळवलेली आहे. 14 वर्षे वनवासाच्या काळात श्रीरामचंद्र काही काळ दंडकारण्यात वास्तव्याला होते. तेव्हा त्यांनी देखील या देवीचं दर्शन घेतलं होतं, अशी आख्यायिका आहे.
एक भाविक म्हणाला, "हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी येतो. देवीचा मुखवटा अतिशय सुंदर आणि तेजस्वी आहे. देवीच्या दर्शनानंतर मन शांत होते."
Location :
Buldana (Buldhana),Buldana,Maharashtra
First Published :
September 27, 2025 1:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: तेजस्वी रुप आणि सरोवराचं सानिध्य, लोणारमधील देवीचं श्री रामांनीही घेतलं होतं दर्शन