mpsc success story : वडील ड्रायव्हर, आई करते शिवणकाम, पण पोरीनं नाव कमावलं, झाली सरकारी अधिकारी
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
मी आणि माझे वडील वर्ध्याहून जळगाव येथे प्रवेशासाठी आलो. त्यावेळी प्रवेश फी किती होती, हेसुद्धा माहिती नव्हते. मात्र, जेव्हा प्रवेश फी माहिती झाली, त्यावेळी पायाखालची जमीनच सरकली. कारण स्वत:जवळ त्यांनी तेव्हा तितके पैसे आणले नव्हते. त्यामुळे प्रवेश होणार काही नाही, असा विचार मनात येत असताना रडू येत होते.
खुशालकांत दुसाने, प्रतिनिधी
जळगाव : जर मनात जिद्द असेल आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर आयुष्यात यश नक्कीच मिळते, हे एका तरुणीने सिद्ध करुन दाखवले आहे. भक्ती फंड असे या तरुणीचे नाव आहे. एमपीएससी या महाराष्ट्रातील अत्यंत कठीण परीक्षेच्या माध्यमातून या तरुणीची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात जलसंधारण अधिकारी (सहाय्यक अभियंता) या पदासाठी निवड झाली आहे. अत्यंत साधारण कुटुंबातून आलेल्या या तरुणीने आपल्या मेहनतीच्या बळावर हे यश मिळवत स्वत:ला सिद्ध केले.
advertisement
तिच्या या यशाबद्दल जळगाव येथील दीपस्तंभ मनोबल फाऊंडेशनच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी न्यूज18 लोकलच्या टीमने तिच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी तिने आपल्या यशस्वी तसेच तितक्याच संघर्षमय प्रवास उलगडला.
भक्ती ही वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या पुलगाव येथील रहिवासी आहे. तिचे वडील खासगी वाहनचालक आहेत. तर आई शेतात शेतमजूरी तसेच शिवणकाम, बचत गटाचे कार्य करत आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळत आहेत. भक्तीचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच ज्ञानभारती विद्यालय पुलगाव येथे झाले. दहावीला तिला 90 टक्के मिळाल्यानंतर तिने डिप्लोमा करण्याचे ठरवले. यासाठी तिला वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज येथे प्रवेश मिळाला आणि याठिकाणी सुद्धा ती वर्धा जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
advertisement
जळगावातील तो अनुभव आजही डोळ्यात पाणी आणणारा -
डिप्लोमा झाल्यानंतर तिने अमरावती येथील एका खासगी कंपनीमध्ये काही काळा नोकरीही केली. त्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी तिला महाराष्ट्रातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे प्रवेश मिळाला. जळगावातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेचा अनुभव सांगताना ती म्हणाली, मी आणि माझे वडील वर्ध्याहून जळगाव येथे प्रवेशासाठी आलो. त्यावेळी प्रवेश फी किती होती, हेसुद्धा माहिती नव्हते. मात्र, जेव्हा प्रवेश फी माहिती झाली, त्यावेळी पायाखालची जमीनच सरकली. कारण स्वत:जवळ त्यांनी तेव्हा तितके पैसे आणले नव्हते. त्यामुळे प्रवेश होणार काही नाही, असा विचार मनात येत असताना रडू येत होते. पण दोन दिवसात सुदैवाने सर्वकाही गोष्टी सुरळीत झाल्या. पैशांची जमवाजमव झाली मला प्रवेश मिळाला, असे म्हणत ती यावेळी भावूक झाली होती.
advertisement
कोरोनाकाळातील त्या अनुभवाने आयुष्याला दिली कलाटणी -
न्यूज18 लोकल18 सोबतच्या या विशेष संवादारम्यान तिने सांगितले की, 2019 मध्ये जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यावर एक वर्ष पूर्ण केले. मात्र, पुढच्या वर्षी कोरोनामुळे घरी यावे लागले. मात्र, घरी आल्यावर मी त्यादरम्यान, माझ्या इंजीनिअरींगच्या अभ्यासासोबत गावातीलच पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची गणित आणि विज्ञान या विषयाची शिकवणी घेतली. जवळपास दीड वर्ष मी विद्यार्थ्यांसाठी शिकवणी घेतली.
advertisement
या विद्यार्थ्यांची शिकवणी घेत असताना माझ्या नजरेखाली पाचवी ते आठवी इयत्तेची इतिहास, भूगोल या विषयांची पुस्तके पडली. त्यासोबतच मला ही पुस्तके आवडू लागली. त्यामुळे मग मी दहावीपर्यंतची पुस्तके विकत घेतली. सुरुवातीला इतिहास, भूगोल न आवडणारे विषय मला आवडू लागले. दरम्यान, नोकरी करताना काही पैसे जमवले होते, त्या पैशातूनच मी मोबाईल विकत घेतला आणि या मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे विविध व्हिडिओ पाहिले. त्याच दरम्यान, मला जळगाव येथील दिपस्तंभ फाऊंडेशनची माहिती मिळाली. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारामध्ये नेमके काय गुण हवेत, हे समजल्यावर आपणही हे चांगल्या पद्धतीने करू शकतो, असा विश्वास मनात आला.
advertisement
कॉलेजला असतानाच एमपीएसी पूर्व परीक्षा पास -
दरम्यान, कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर मला कॉलेजला परतावे लागले. शेवटचे सेमेस्टरचा अभ्यास सुरू झाला होता. पण मी याचदरम्यान, एमपीएससीचा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा फॉर्म भरला. यामध्ये पूर्व परीक्षा मी उत्तीर्ण झाली. पण महाविद्यालयाच्या परीक्षेमुळे मी मुख्य परीक्षेचा अभ्यास करू शकले नाही. आधी महाविद्यालयाच्या अभ्यास पूर्ण करत इंजीनिअरींग पूर्ण केले. त्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास केला. ऑक्टोबरमध्ये मुख्य परीक्षा दिली. यावेळी मला वाटलं की, माझं होणार नाही कारण खूप कमी कालावधीत तयार केली होती. अनेक जण अनेक वर्षांपासून तयारी करतात. त्यामुळे माझी निवड होणार नाही, असं मला वाटलं.
advertisement
अन् चालकाची मुलगी झाली सरकारी अधिकारी -
त्यामुळे पुन्हा डिसेंबर 2022 मध्ये पूर्व परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. पूर्व परीक्षा पास झाल्यावर मी 23 एप्रिल 2023 ला मुख्य परीक्षेचा पेपर दिला आणि मी मुख्य परीक्षा पास झाले आणि याच वर्षी 22 फेब्रुवारी 2024 रोजी माझी मुलाखत झाली. यानंतर 28 फेब्रुवारी 2024 रोजी निकाल झाला. या निकालात माझी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात असिस्टंट इंजिनिअर जलसंधारण अधिकारी या पदासाठी निवड झाली. भक्ती ही एसबीसी प्रवर्गातून राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली, असेही तिने यावेळी सांगितले.
सध्या पीडब्ल्यूडीमध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती -
भक्ती पुढे बोलताना म्हणाली की, स्पर्धा परीक्षा हे एक असं क्षेत्र आहे, जोपर्यंत तुम्हाला नियुक्ती मिळत नाही. तोपर्यंत सातत्याने विविध पदांच्या परीक्षेसाठी उमेदवार तयारी करत असतो. त्यामुळे मीसुद्धा तयारी करत असताना 15 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाची सरळसेवा परीक्षा दिली. यानंतर या परीक्षेची 26 जानेवारीला तात्पुरती गुणवत्ता यादी (provisional merit list) जाहीर झाली. यामध्ये नंतर 8 फेब्रुवारीला अंतिम गुणवत्ता यादी (final merit list) जाहीर झाली. यामध्ये माझी निवड झाली आणि शेवटी सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर मला यानंतर 13 मार्चला मला नियुक्ती मिळाली. सध्या मी पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू असल्याचे तिने सांगितले. माझ्या या संपूर्ण प्रवासात माझे आई वडील, माझे सर्व शिक्षक आणि दिपस्तंभ फाऊंडेशन आणि माझ्या मित्रपरिवाराचा मोठा वाटा आहे, असेही तिने यावेळी सांगितले.
स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिला हा सल्ला -
view commentsस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सल्ला देताना ती म्हणाली की, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना गोल ओरिएंटेड अभ्यास आणि मनापासून अभ्यास करायला हवा. वेळ निर्धारित करुन जर अभ्यास केला तर नक्कीच यश मिळते. तसेच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे distraction पासून तुम्ही जितकं लांब राहाल, तिथंच तुम्ही अर्धी लढाई जिंकलात असं समजा. म्हणून मोबाईलपासून जितकं दूर राहाल तितका तुमचा फायदा होईल. दररोज डायरी सोबत ठेवा. डेली अॅनालिसिस करा. वेळेचं व्यवस्थापन फार महत्वाचं आहे, असा सल्लाही तिने विद्यार्थ्यांना दिला.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
March 31, 2024 1:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
mpsc success story : वडील ड्रायव्हर, आई करते शिवणकाम, पण पोरीनं नाव कमावलं, झाली सरकारी अधिकारी


