शेतकऱ्याच्या लेकीचा डबल धमाका!, आधी वनअधिकारी अन् आता उपशिक्षणाधिकारी पदाला गवसणी!
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
आज आपण एका शेतकऱ्याच्या मुलीची यशोगाथा जाणून घेणार आहोत, जिने नुकतीच एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपशिक्षणाधिकारी पदाची परीक्षा पास केली आहे. तिच्या या यशानंतर न्यूज18 लोकलच्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला.
खुशालकांत दुसाने, प्रतिनिधी
अकोला : महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतात. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. पण दरवर्षी अगदी मोजक्याच विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याची संधी मिळतो. त्यातही स्पर्धा परीक्षांमध्ये अनिश्चितता असल्याने त्या दरम्यान, संयम ठेवून अभ्यास करणे, ही सुद्धा एक मोठी बाब असते. मात्र, अशा सर्व परिस्थितीवर मात करत काही विद्यार्थी यामध्ये यश मिळवतात.
advertisement
आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या मुलीची यशोगाथा जाणून घेणार आहोत, जिने नुकतीच एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपशिक्षणाधिकारी पदाची परीक्षा पास केली आहे. तिच्या या यशानंतर न्यूज18 लोकलच्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला.
30 विद्यार्थ्यांपैकी फक्त 2 जण पास -
शुभांगी राऊत असे या तरुणीचे नाव आहे. ती अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील विराहीत या गावातील रहिवासी आहे. तिचे आई वडील हे शेती करतात. भाऊ शेती करतो. तर बहीण पदवीचे शिक्षण घेत आहे. शुभांगी हिने पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत घेतले. यानंतर आठवी ते दहावीचे शिक्षण हे गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या ज्ञानप्रकाश महाविद्यालय कानडी येथून पूर्ण केले. यानंतर 2013 मध्ये विज्ञान शाखेत ती बारावी इयत्ता पास झाली. तिच्या गावातील एकूण 30 मुलांपैकी फक्त 2 जण बारावीच्या वर्गात पास झाले होते. त्या दोनमध्ये ती एक होती. त्यात ग्रामीण भाग, त्यामुळे मुलीचे लवकर लग्न व्हावे, असे अनेकांना वाटते. मात्र, तिने आपल्या आई वडिलांना शिकवण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी तिच्या विनंती मान्य करत पुढील शिक्षणाला सुरुवात केली आणि 2016 मध्ये पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय अकोला येथून अॅग्रीकल्चर या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
advertisement
आधी वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी -
शुभांगीने पदवीच्या शिक्षणानंतर 2017 मध्ये स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यासाठी तिने छत्रपती संभाजीनगर येथील रिलायबल अकॅडमीचे धनंजय अकात यांच्या मार्गदर्शनात तयारी केली. दरम्यान, 2019 मध्ये तिने महाराष्ट्र वनसेवेची परीक्षा पूर्व परीक्षा दिली होती. यामध्ये तिला यश मिळाल्यावर 2020 मध्ये तिने मुख्य परीक्षा दिली. त्यातही ती उत्तीर्ण झाल्यानंतर 2020 मध्ये तिने यासाठी मुलाखत दिली. मात्र, जवळपास दोन वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये महाराष्ट्र वनसेवा परीक्षेचा निकाल लागला आणि शेतकऱ्याची मुलगी असलेली शुंभागी राऊत ही वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर झाली. सध्या ती उत्तराखंड येथील डेहराडून येथील फॉरेस्ट ट्रेनिंग अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहे आणि याच प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्या सध्या महाराष्ट्रातील अकोला रेंज या ठिकाणी सेवा बजावत आहे.
advertisement
फॉरेस्ट ऑफिसर होऊनही अनेक जण म्हणाले अरे ही कसली नोकरी -
न्यूज18 लोकलसोबत बोलताना तिने सांगितले की, ज्यावेळी मी वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर झाली त्यावेळी गावाकडचे काही जण म्हणाले, अरे ही कसली नोकरी, इतकी मेहनत केली आणि जंगलातली नोकरी मिळाली. जंगलात बंदूक घेऊन जाणार का, असे विविध प्रश्न विचारले जायचे. थोड्या प्रमाणात मी माझ्या पद्धतीने सांगितले पण शेवटी किती लोकांना समजावून सांगणार. पण शेवटी प्रशिक्षणादरम्यान, जेव्हा मी भारत दर्शनावर होते, तेव्हा तेथील फोटो मी स्टेटसवर टाकले तेव्हा लोकांना कळले की गावातली मुलगी मोठ्या पदावर गेली.
advertisement
अन् शेतकऱ्याची मुलगी झाली उपशिक्षणाधिकारी -
2022 मध्ये एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा दिल्यावर 2023 मध्ये तिने मुख्य आणि मुलाखत दिली. महाराष्ट्रातील या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या एमपीएससी परीक्षेतील सर्व टप्प्यांवर सर्व पातळीवर तिने या यश मिळवले. नुकतीच या परीक्षेची मेरिट यादी जाहीर झाली. या परीक्षेत शुभांगी राऊत हिची एमपीएससीकडून उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली आहे. तिच्या या यशानंतर कुटुंबातच नव्हे तर गावातही आनंदाचे वातावरण आहे.
advertisement
कुटूंब नातेवाईक आणि इतर लोकांना सांगणं आव्हान -
स्पर्धा परीक्षेत वेळ द्यावा लागतो. यश मिळेलच असं नाही. पण या दरम्यान, आपल्याला कुटुंबीयांना, बाहेरच्या लोकांना, नातेवाईकांना सांगत राहावं लागतं, की हो मी तयारी करत आहे आणि एक दिवस नक्की मी यशस्वी होईल. पण होईल आणि झालं, यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे स्वत:ला सांगणं, होईल आपलं, इतरांना सांगणं, हे सर्व मोठं आव्हान असतं. बारावीपर्यंत जास्त कधी अभ्यास केला नाही. शाळेत जायचं. घरी आल्यावर घरची कामं करायची. पदवीच्या शिक्षणादरम्यान, सुट्ट्यांमध्ये शेतात जाऊन काम केलीत.
advertisement
inspiring story : बापाचं छत्र हरवलं, जागा नसल्याने बाथरुममध्ये अभ्यास; पण उजमानं करुन दाखवलं!
असं कुठलंही काम नाही की शेतात जाऊन मी केलं नाही. घरची आर्थिक परिस्थिती साधारण होती. तिला बदलायचं, आई वडिलांच्या आयुष्यात बदल घडवायचा, ही सर्वात महत्त्वाची प्राथमिकता होती. माझ्या या यशाचे श्रेय आई वडील आणि माझ्या मित्रपरिवाराला जाते, असेही ती म्हणाली. तसेच यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथील धनंजय अकात सर यांच्या वर्ल्ड क्लास 60 नावाच्या प्रकल्पाचा मोठा वाटा माझ्या यशात आहे, असेही तिने यावेळी सांगितले.
गावातल्या मुलानं सर्वांना सांगितली होती ती गोष्ट -
वडिलांना विनंती केल्यानंतर मी बीएस्सीला प्रवेश मिळवला होता. बीएस्सीचे शिक्षण सुरू असतानाच आमच्या गावातील एका मुलाने, गावात सर्वांना सांगितलं होतं की, बीएस्सीचं शिक्षण घेतल्यावर नोकरी नक्कीच मिळते. पण दुसरीकडे माझं बीएस्सी झाल्यावर माझ्या हातात नोकरी नव्हती. त्यामुळे अनेकांच्या प्रश्नांना, त्या प्रसंगाला मला सामोरे जावे लागले.
वडिलांना अनेक लोकं म्हणायचे की, मुलींचे लग्न होत आहेत. तुमच्या मुली इतक्या मोठ्या झाल्या. तुम्हाला कळत नाही का, जे लोकं माझ्या शिक्षणावर, माझ्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे. तेच लोकं आज कौतुक करत आहेत. आपल्या गावाचं नाव मोठं झालंय, अशी भावना व्यक्त करत आहेत. एकेकाळी जे लोक कृषी सेवा केंद्रातील औषधी आठवड्याभरासाठी उधार देत नव्हते, तेच लोकं आज या यशाचा आनंद व्यक्त करत आहेत. माझ्या या यशामुळे माझ्या वडिलांना एक सुखद अनुभव होत आहे.
माझ्या आयुष्यातील कष्टांचं चीज झालं, अशी भावना ते व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच माझ्यासाठी मोठी समाधानाची बाब असल्याचे तिने सांगितले. तसेच आजपर्यंत अनेक मित्र मैत्रिणींनी मला विविध प्रसंगात मदत केली, त्यामुळे माझे आई वडील आणि मित्र मैत्रिणी यांचा या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे, असे ती म्हणाली. तसेच यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथील धनंजय अकात सर यांच्या वर्ल्ड क्लास 60 नावाच्या प्रकल्पाचा मोठा वाटा माझ्या यशात आहे, असेही तिने यावेळी सांगितले.
तरुणाईला महत्त्वाचा सल्ला -
view commentsआज तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता तसेच मोबाईलचा मोठ्या प्रमाणात गैरवापर पाहायला मिळतो. पण मोबाईलचा चांगल्या प्रमाणातही वापर करता येऊ शकतो. अनेकांना वाटतं की, आपण एखाद्या लहान ठिकाणी किंवा गावात राहतो, त्यामुळे आपण आयुष्यात काही करू शकत नाही, स्वप्न पाहू शकत नाही. पण असं नाही. स्वप्न पाहायला हवी आणि मनापासून इच्छा असेल तर त्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही निदान 50 टक्के तरी त्यापर्यंत पोहोचाल. स्वप्नांचा पाठपुरावा सातत्याने करत राहायला हवे. आपल्याकडे पैसा वगैरे नाही, अशा सर्व अडचणींना तोंड द्यायला हवे, असा सल्ला तिने स्पर्धा परीक्षार्थींना दिला.
Location :
Akola,Maharashtra
First Published :
March 29, 2024 6:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
शेतकऱ्याच्या लेकीचा डबल धमाका!, आधी वनअधिकारी अन् आता उपशिक्षणाधिकारी पदाला गवसणी!


