अजित पवारांची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही, छाती ठोकत किरीट सोमय्या यांचा इशारा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar vs Kirit Somaiya: सत्तेत एकत्र असताना परस्परविरोधी भूमिका घेतल्याने महायुतीमधील बेबनाव सातत्याने समोर येत आहे. भोंगेविरोधी आंदोलनाची धार कायम ठेवून हिंदुत्वाचा अजेंडा सोमय्या पुढे रेटत आहेत. तर सत्तेत असतानाही धर्मनिरपेक्ष विचार सोडला हे दाखविण्यासाठी अजित पवार कधीकधी नवहिंदुत्ववादी नेत्यांना झापत आहेत.
बुलडाणा : मशिदीवरील भोंगेविरोधी आंदोलनाची धार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तळपती ठेवली आहे. राज्यातल्या विविध शहरांत जाऊन तेथील मशिदीवरील भोंग्यांच्याविरोधात स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊन किरीट सोमय्या आवाज उठविताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर काही अल्पसंख्याक नेत्यांनी धर्मनिरपेक्ष विचार सांगणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावर अजित पवार यांनी संतप्तपणे किरीट सोमय्या यांनी कायदा हातात घेता कामा नये, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या याच प्रतिक्रियेवर किरीट सोमय्या यांनीही जोरदार पलटवार केला आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपसोबत एकत्र आलो, असे उठता बसता सांगताना धर्मनिरपेक्ष विचारांशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही, असा ठाम निर्धार अजित पवार व्यक्त करताना दिसतात. दुसरीकडे भाजप नितेश राणे आणि किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाला जाणून बुजून लक्ष्य करीत असल्याची तक्रार काही नेत्यांनी अजित पवार यांच्याकडे केली. त्यानंतर अजित पवार यांनी सोमय्या यांना खडसावून कायदा हातात घेऊ नका, अशी स्पष्ट सूचना केली.
advertisement
महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही- किरीट सोमय्या
महाराष्ट्रातील मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम हाती घेतली आहे. आज बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून मशिदींवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवा, अशी सूचना केली. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांच्या भूमिकेवर सोमय्या यांना विचारले असता ते चांगलेच भडकले. "ध्वनी प्रदूषण कायदा सर्वप्रथम राजीव गांधी यांच्या सरकारने संमत केला. त्यात वाजपेयी सरकारने २००२ साली नियम प्रसिद्ध केले. ध्वनी प्रदूषणाचा कायदा गणपती महोत्सव, नवरात्रीला लागू होत असेल तर तो मशिदीला देखील लागू झालाच पाहिजे", असे सांगत महाराष्ट्रातील काही नेते दादागिरी करीत असतील तर ती चालू देणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला. मुंबईतील मशिदीवरील भोंगे खाली उतरवले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातले भोंगे उतरवावे लागणारच, असे म्हणत आपल्या भूमिकेत ठाम असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
advertisement
सोमय्या यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अजितदादांचा संताप
अजानसाठी वापरण्यात येणाऱ्या बेकायदा भोंग्यासंदर्भात मुंबईतील मशिदींची तपासणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कायदा हातात घेता कामा नये, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. महाराष्ट्र प्रशासन याकामी लक्ष घालण्यासाठी आहे. पण लक्ष घालू नये, अशा आशयाचे विधान अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांना उद्देशून केले होते.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
June 26, 2025 7:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही, छाती ठोकत किरीट सोमय्या यांचा इशारा