कोल्हापुरात गॅससाठी हाहाकार! एजन्सीमध्ये तुफान राडा, नागरिकांच्या लांबच लांब रांगा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आखाती युद्धामुळे कोल्हापूरच्या राजारामपुरीत गॅस तुटवडा जाणवत आहे. नागरिकांच्या लांब रांगा, संताप आणि वादावादीचे दृश्य. प्रशासनाने सहकार्याचे आवाहन केले आहे.
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: आखाती युद्धाची झळ आता भारताला तीव्र जाणवत आहे. या युद्धामुळे गॅसचा मोठा तुटवडा पडला आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी भागात आज गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, गॅसचा तुटवडा आणि वाढता उशीर यामुळे ग्राहकांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा असून, याचा थेट फटका कोल्हापूरकरांना बसताना दिसत आहे.
राजारामपुरीत तणावाचे वातावरण
आज सकाळी राजारामपुरीतील गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी नागरिकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने नागरिक संतापले होते. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात मोठी वादावादी झाली. "आम्ही घरची कामे सोडून इथे रांगेत उभे आहोत, पण गॅस कधी मिळणार याची शाश्वती कोणीच देत नाही," अशा संतप्त प्रतिक्रिया गृहिणींनी व्यक्त केल्या. अनेक ठिकाणी वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले असून, परिस्थिती हाताळताना कर्मचाऱ्यांची मोठी ओढाताण झाली.
advertisement
युद्धाची झळ थेट किचनपर्यंत
मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलासह गॅसच्या किमतीत आणि पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. भारताची इंधन आणि गॅसची गरज मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्याने, आखातातील तणावाचा परिणाम स्थानिक वितरणावर होताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून गॅसचा पुरवठा काही प्रमाणात मंदावला असून, ज्यांच्याकडे एकच सिलिंडर आहे अशा कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे.
advertisement
प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन
दुसरीकडे, गॅस वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, डिपोमधून गॅसचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने हा तुटवडा जाणवत आहे. युद्धामुळे पुरवठा साखळीत खंड पडल्याने सिलिंडर वेळेवर पोहोचत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. ऐन महागाईच्या काळात आता गॅससाठीही तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने सर्वसामान्य कोल्हापूरकरांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 9:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापुरात गॅससाठी हाहाकार! एजन्सीमध्ये तुफान राडा, नागरिकांच्या लांबच लांब रांगा








