यंदा काय आहे गणेश मूर्तींचा ट्रेंड? पाहा कुंभार गल्ल्यांमधील लगबग, Video
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून कुंभार गल्ल्यांमध्ये लगबग सुरू आहे. पाहा यंदा गणेशमूर्तींचा ट्रेंड काय आहे?
कोल्हापूर, 10 ऑगस्ट : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आता बाजारपेठेत हळूहळू लगबग जाणवू लागली आहे. मात्र कुंभार बांधवांमध्ये गणेश मूर्ती बनवण्याची लगबग गेली कित्येक दिवसांपासून सुरू झालेले आहे. कोल्हापुरातही सध्या गणेश मूर्ती बनवून त्यांना रंग देण्याचे काम अर्ध्याहून अधिक पूर्णत्वास आलेले आहे. तर कोल्हापुरातून इतर जिल्ह्यांसह बाहेरच्या राज्यांमध्ये देखील गणेश मूर्ती जातात. त्यामुळे अशा मूर्तीही आता तयार झाल्या आहेत.
इथं बनतात गणेशमूर्ती
कोल्हापूर शहरात बापट कँप, शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी, गंगावेश आदी अनेक ठिकाणी गणेशमूर्ती बनवण्याचे काम चालते. येथील अनेक कुंभार बांधव पिढ्यानपिढ्या सुंदर अशा गणेश मूर्ती बनवण्याचे काम करत आले आहेत. यावेळी अधिक श्रावण महिना आल्यामुळे कामा साठीही थोडा जास्तीचा वेळ मिळाला आहे. मात्र तरीही मूर्ती बाहेर पाठवत असल्याने वेळेत काम पूर्ण करावेच लागत असल्याचे येथील कारागिरांनी सांगितले आहे.
advertisement
शाहूपुरी कुंभार गल्ली प्रसिद्ध
कोल्हापूरच्या शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये अनेक कुंभार राहतात. गेली कित्येक वर्षे ते इथे गणेशमूर्ती घडवण्याचे काम करत आहेत. गेली 30 वर्षांहून अधिक वर्षे गणेशमूर्ती बनवणारे मोहन आरेकर हे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्याकडे शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे मिश्रणापासून बनवलेल्या 1.5 ते 5 फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती मिळतात. इतरांप्रेमाणेच त्यांचे सर्व कुटुंबीयही हेच काम करत असते. दरवर्षी किमान 1 हजार मूर्ती ते बनवून विकत असतात.
advertisement
किती काम पूर्ण?
पावसाच्या दिवसात मूर्तींचे काम अर्ध्यावर राहण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या कुंभार बांधवांकडे मोल्डिंगचे काम हे जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. तर मूर्तींना रंग देण्याचेही काम गेले महिनाभरापासून सुरू असून तेही काम जवळपास 40 ते 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर गणेशोत्सवाला आता अगदी 50 पेक्षाही कमी दिवस शिल्लक राहिल्याने शिल्लक कामही लवकरच पूर्ण होईल, असेही आरेकर म्हणाले
advertisement
कुठे कुठे जातात मूर्ती
कोल्हापुरातून गणेशमूर्ती या महाराष्ट्रातील अनेक शहरांसह बाजूच्या गोवा, कर्नाटक या राज्यामध्ये देखील पाठवल्या जातात. यामध्ये ऑर्डर करण्यात आलेल्या मूर्तींपैकी 30 ते 40 टक्के पाठवण्यात आलेल्या आहेत. तर बाकीच्या बाहेर जाणाऱ्या मूर्ती गोकुळाष्टमी पर्यंत पाठवल्या जाणार आहेत.
advertisement
यंदा कोणत्या गणेश मूर्तींचा ट्रेंड?
सर्वसामान्यतः मूळ रुपातल्या गणेशमूर्ती लोकांना जास्त आवडतात. पण सध्या नवी एक आवड लोक जोपासू लागलेत. आपल्या गणपती बाप्पाला जितके खरे रूप देता येईल तितके ते त्यांना आवडते. त्यामुळेच मूर्तीला खरे धोतर, उपरणे, फेटा नेसवता येईल अशा मूर्तींना सध्या स्थानिक पातळीवर मागणी वाढू लागली आहे, असे आयरेकर यांनी सांगितले. दरम्यान, हीच परिस्थिती सध्या कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील इतर कुंभार वस्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे. कुंभार बांधवांचे हात हे गणेश मूर्तींवर लगबगीने फिरू लागलेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 10, 2023 10:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
यंदा काय आहे गणेश मूर्तींचा ट्रेंड? पाहा कुंभार गल्ल्यांमधील लगबग, Video