कोल्हापूरात 15 ऑगस्टला रिचवल्या जातात लाखो जिलेब्या? काय आहे यामागील कारण?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी रोजी कोल्हापूरकर जिलेबी खरेदी करण्यासाठी हमखास गर्दी करतात. त्याचं कारण माहिती आहे?
कोल्हापूर, 14 ऑगस्ट : राष्ट्रीय सणांच्या निमित्तानं 'हर घर तिंरगा' हे अभियान केंद्र सरकारकडून राबवले जात आहे. कोल्हापूर शहरात मात्र राष्ट्रीय सणांच्या दिवशी 'हर घर जिलेबी' ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून राबवली जात आहे. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी रोजी कोल्हापूरकर जिलेबी खरेदी करण्यासाठी हमखास गर्दी करतात. त्या दिवशी प्रत्येक घरी जिलेबी हे पक्वान्न असते.
15 ऑगस्ट जवळ येतो, तशी कोल्हापूरच्या मिठाईवाल्यांची त्या दिवशी बनवावी लागणाऱ्या जादाच्या जिलेबीसाठीची तयारी जोर धरू लागते. कोल्हापूरचे तांबड्या-पांढऱ्या रश्याबरोबर घट्ट नातं आहे. तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त राष्ट्रीय सणाच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या जिलेबीशी आहे.
advertisement
15 ऑगस्ट दिवशी सकाळी लवकर उठायचे, ध्वजवंदन करायला जायचे आणि घरी परतताना गरमागरम जिलेबी घेऊनच परत यायचे. असा अलिखित नियमच कोल्हापूरकरांच्या अंगवळणी पडलेला आहे. गरीब असो वा श्रीमंत, कष्टकरी असो वा व्यापारी प्रत्येकाच्या घरी या दिवशी जिलेबी ही खाल्ली जाते.
कशी सुरु झाली परंपरा?
कोल्हापूर ही कुस्तीपंढरी आहे. उत्तर भारतामधील अनेक मल्ल इथं कुस्तीत नशीब आजमावण्यासाठी येतात. तिकडच्या लोकांच्या खानपानात जिलेबी हा गोड पदार्थ हमखास असतो. जवळपास 130-140 पूर्वी वर्षांपूर्वी रामचंद्र बाबाजी माळकर यांचे कोल्हापूर महानगरपालिका चौकात प्रसिद्ध हॉटेल होते. त्यांच्या हॉटेलमध्ये फक्त जिलेबी खाण्यासाठी गर्दी होत असे. पुढे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला शहरात हळूहळू जिलेबीचे स्टॉल लागू लागले. त्यानंतर ही परंपराच सुरू झाली, अशी माहिती मिठाई व्यावसायिक योगेश माळकर यांनी सांगितले.
advertisement
राजर्षी शाहू महाराज आणि जिलेबी..
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या काळापासून ही परंपरा सुरू झाली आहे. त्यावेळी राजवाड्यावर आमच्या दुकानातूनच जिलेबी पाठवली जात होती. तेव्हापासून आजतागायत जिलबीनेच तोंड गोड करण्याची पद्धत सुरू आहे, असंही माळकर यांनी सांगितलं.
कोल्हापुरात हा परिसर माळकर तिकटी या नावे जिलेबीसाठीच ओळखला जातो. बाराही महिने आमच्या दुकानात जिलेबी आणि इतर गोडधोड मिळत असते. रोज फक्त जिलेबीचा 200 ते 250 किलो खप फक्त आमच्या एका दुकानात एकाच दिवसात होत असतो. मात्र 15 ऑगस्टच्या निमित्ताने 8 ते 10 टन जिलेबीचा खप आमच्या दुकानात होतो. या आकडेवारीनुसार कोल्हापूर शहरात आणि एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात किती जिलेबी विकली जात असेल, याचा अंदाज येतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 14, 2023 11:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरात 15 ऑगस्टला रिचवल्या जातात लाखो जिलेब्या? काय आहे यामागील कारण?