अंबाबाई देवीचा अवभृत स्नान सोहळा पाहिलात का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व, Video
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
करवीर निवासिनी अंंबाबाई देवीचा अवभृत स्नान सोहळा संपन्न झाला. पाहा काय आहे धार्मिक महत्त्व..
कोल्हापूर, 11 ऑगस्ट: कोल्हापूरची पावन भूमी ज्या महत्त्वाच्या गोष्टीमुळे सर्वदूर ज्ञात आहे, त्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या विविध धार्मिक विधी कोल्हापुरात मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडतात. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यातील देवीच्या अवभृत स्नानाचा विधी नुकताच संपन्न झाला. पण हा अवभृत स्नानाचा विधी नेमका कसा असतो? हा विधी का केला जातो? अशा प्रश्नांची उत्तरे कित्येकांना ठाऊक नाहीत.
कोल्हापूर म्हटलं की अंबाबाई देवी हे समीकरण दृढ आहे. मग अंबाबाई देवीच्या विविध उत्सवांच्या वेळी देखील कोल्हापूरकर मोठ्या संख्येने, भक्तिपूर्ण भावनेने उपस्थिती लावत असतात. अवभृत स्नान विधीवेळी देखील शेकडो भाविक हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर जमले होते. तर मंदिरापासून पंचगंगा नदी पर्यंत काढण्यात आलेल्या पालखी मार्गावर देखील नागरिक वाट पाहत थांबले होते.
advertisement
कसा पार पडला अवभृत स्नान सोहळा?
खरंतर दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याला धार्मिक महत्व आहे. या महिन्यात घरोघरी तसेच प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी विविध धार्मिक विधि पार पाडले जातात. त्याचप्रमाणे श्री अंबाबाई मंदीरामध्येही अधिक श्रावण मासानिमित्त शनिवार, दि. 12 ऑगस्ट पर्यंत हे धार्मिक अनुष्ठान सुरू होते.
advertisement
अनुष्ठान समाप्तीनंतर अवभृत स्नानासाठी सकाळी शाही लवाजम्यासह देवीची उत्सवमूर्ती पालखीतून पंचगंगा नदीकडे रवाना झाली. पंचगंगा नदीतीरावर गेली कित्येक वर्षांच्या परंपरेप्रमाणे धार्मिक विधी होऊन देवी आणि समस्त भक्तजनांचे गंगास्नान अर्थातच देवीचा अवभृत स्नान सोहळा संपन्न झाला. यानंतर जलक्रीडा करून देवीची उत्सवमूर्ती पारंपारिक मार्गाने पालखीतून मंदिरात आणण्यात आली. नंतर पूर्णाहुती होऊन पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित अनुष्ठानाची सांगता करण्यात आली.
advertisement
काय आहे अवभृत स्नानाचे महत्त्व ?
हा अवभृत स्नान सोहळा आणि त्याच्या धार्मिक महत्त्वाबद्दल मंदिर अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी माहिती दिली आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये जे पुण्य कर्म केले जाईल, त्याचे अधिकाधिक पुण्य मिळते असा शास्त्र संकेत आहे. त्यालाच अनुसरून या पुरुषोत्तम मासामध्ये दरवेळी अंबाबाईच्या मंदिरामध्ये अनुष्ठान केले जाते. या अनुष्ठानाची सांगता म्हणून अवभृत स्नानाचा हा विधी केला जातो, असे प्रसन्न मालेकर सांगतात.
advertisement
त्याचबरोबर यज्ञाच्या पूर्ण फळाच्या प्राप्तीसाठी यज्ञ साहित्यासह यजमान पुरोहित आणि देवता यांनी क्षेत्रातील पवित्र नदी किंवा जलप्रवाहाच्या ठिकाणी जाऊन स्नान करावे, अशी अवभृत स्नानाची पद्धत आहे. त्यानुसारच यंदाही भक्तजनांच्या उपस्थितीत पंचगंगा नदीतिरावर अंबाबाई देवीचा हा सोहळा पार पडला, असेही मालेकर यांनी सांगितले.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 13, 2023 3:11 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
अंबाबाई देवीचा अवभृत स्नान सोहळा पाहिलात का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व, Video