181 वर्षांची परंपरा, काय आहे अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपाचा इतिहास, अनेकांना माहिती नसेल VIDEO
- Published by:News18 Marathi
- local18
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
garud mandap kolhapur - गणेशोत्सवातही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना ही इथेच होते. अशा या ऐतिहासिक गरुड मंडपाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व नेमके काय आहे, हेच आपण आज जाणून घेऊयात. याबाबत लोकल18 च्या टीमने ज्येष्ठ मंदिर अभ्यासक उमाकांत रानिंगा यांच्याशी संवाद साधला.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या 'करवीर निवासिनी अंबाबाई' मंदिरातील गरुड मंडपाच्या दुरुस्तीचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. 1839 च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या या गरुड मंडपाला करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या वास्तव्याच्या ठिकाणी याला एक विशेष महत्त्व आहे. जवळपास 181 वर्ष जुन्या या गरुड मंडपात दर शुक्रवारी श्री महालक्ष्मी इथे सदरेवर बसते अशी मान्यता आहे.
advertisement
त्याचबरोबर गणेशोत्सवातही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना ही इथेच होते. अशा या ऐतिहासिक गरुड मंडपाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व नेमके काय आहे, हेच आपण आज जाणून घेऊयात. याबाबत लोकल18 च्या टीमने ज्येष्ठ मंदिर अभ्यासक उमाकांत रानिंगा यांच्याशी संवाद साधला.
गरुड मंडपाचे महत्त्व -
यावेळी त्यांनी सांगितले की, मंदिर शास्त्रानुसार हा भाग मंदिराच्या उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मंदिर परिक्रमेनंतर देवीची पालखी काही काळ विश्रांतीसाठी येथेच ठेवली जाते आणि त्याचबरोबर मंदिरातील अनेक धार्मिक विधी याच गरुड मंडपामध्ये केले जातात. गरुड मंडपाचा इतिहास पाहिला तर गरुड मंडप हा साधारण 1839 च्या दरम्यान उभा करण्यात आल्याचे उल्लेख आढळतात.
advertisement
हा मंडप करवीर छत्रपती याच्या संस्थानचे पॉलिटिकल एजंट दाजी पंडितराव यांच्या कार्यकीर्दीत देवीच्या सदरेवरील कार्यक्रम व्यवस्थित पार पडावे, यासाठी उभारण्यात आला होता. तेव्हापासून गरुड मंडप हा अंबाबाई मंदिराचा मुख्य भाग म्हणून ओळखला जातो. सुबक लाकडी दर्जेदार नक्षीकाम असल्यामुळे आणि पौराणिक ग्रंथात गरुडाचा उल्लेख आढळत असल्याने या मंडपाला 'गरुड मंडप' असे नाव पडले. गरुड मंडपाला एकूण 48 खांब आहेत. यात 20 फूट लांबी आणि 15 इंच बाय 15 इंच जाडीचे आठ मुख्य खांब आहेत.
advertisement
नवरात्रौत्सवात साकारणार गरुड मंडपाची प्रतिकृती -
कोल्हापूरचे अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जात असतो. मंदिर परिसरात या निमित्ताने सर्व प्रकारचे नियोजन करण्यात येत असते. त्या मंदिराचा एक भाग असलेल्या गरुड मंडपाची सध्या पुनर्बांधणी सुरू आहे. जुना गरुड मंडप पूर्णपणे काढला जात आहे. त्याच ठिकाणी पूर्वीप्रमाणेच सागवानी लाकडाचा वापर करुन नवा मंडप उभारला जाणार आहे. मात्र, हे काम पुढे जानेवारी 2025 पर्यंत चालण्याची शक्यता आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीमार्फत या गरुड मंडपाच्या जागी एक प्रतिकृती उभारली जाणार आहे आणि त्या ठिकाणीच नवरात्रीतील देवीचे पूजा विधी पार पाडले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
advertisement
पुढे ते म्हणाले की, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप हा जरी अंबाबाई मंदिराचा एक भाग असला, तरी गरुड मंडपाची रचना ही मंदिरापासून वेगळी आहे. हा गरुड मंडपाची बांधणी अलीकडच्या काळात करवीर संस्थानचे दाजी पंडितराव यांच्या कारकिर्दीत झाली असल्याची माहिती मंदिर अभ्यासक उमाकांत राणींगा यांनी दिली.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 24, 2024 2:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
181 वर्षांची परंपरा, काय आहे अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपाचा इतिहास, अनेकांना माहिती नसेल VIDEO