बोगस लाडक्या बहिणींना मोठा धक्का, सरकार वसूल करणार 15 कोटी, तुम्ही तर फसवणूक केली नाही
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लाडकी बहीण योजनेत 8 हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी नियमभंग करून 15 कोटींचा लाभ घेतला. सरकार शिस्तभंग आणि वसुलीची कारवाई करणार आहे. फेरतपासणी सुरू आहे.
सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या योजनेचा लाभ नियमांचे उल्लंघन करून घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. अशा महिला कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल 8 हजार पर्यंत पोहोचली आहे. राज्य सरकारने आता या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय त्यांच्याकडून पूर्ण पैसे देखील वसूल केले जाणार आहेत.
8 हजार कर्मचारी रडारवर; 15 कोटींची वसुली
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना नियमांना डावलून फसवणूक केलेल्या या 8 हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर आता दुहेरी कारवाई होण्याची शक्यता आहे. नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतल्याबद्दल या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून जेवढ्या हप्त्यांचा लाभ घेतला आहे, ती सर्व रक्कम सरकार परत वसूल करणार आहे. ही एकूण रक्कम जवळपास 15 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे.
advertisement
या फसवणूक करणाऱ्या महिलांकडून वसूल करायची रक्कम नेमकी कशी गोळा करायची, याबाबत सध्या प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही भाग कापून ही रक्कम वसूल केली जाऊ शकते. किंवा, त्यांना ही रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्यासाठी थेट सूचना दिली जाऊ शकते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी निश्चित उत्पन्न मर्यादा आणि इतर निकष ठरवून देण्यात आले होते. मात्र, सरकारी कर्मचारी असूनही, या महिलांनी नियमांना 'कचऱ्याची टोपली' दाखवून या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतला. त्यामुळे आता त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार हे निश्चित आहे.
advertisement
फेरतपासणी सुरूच
सध्याही 'लाडकी बहीण' योजनेसाठी आलेल्या अर्जांची फेरतपासणी आणि छाननी सुरू आहे. यामुळे फसवणूक करून लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 8 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच मोठ्या योजनेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने, प्रशासकीय कामकाजावर आणि योजनेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारवाईमुळे भविष्यात कोणताही सरकारी कर्मचारी अशा योजनांचा गैरफायदा घेताना विचार करेल, असा सक्त संदेश सरकारने दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 7:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बोगस लाडक्या बहिणींना मोठा धक्का, सरकार वसूल करणार 15 कोटी, तुम्ही तर फसवणूक केली नाही