Vande Bharat : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! स्लीपर वंदे भारतची होणार लवकर सुरुवात, जाणून घ्या कधीपासून धावणार?
Last Updated:
Vande Bharat : लातूरमध्ये तयार करण्यात आलेला देशातील पहिला वंदे भारत स्लीपर कोच जून महिन्यापासून रुळांवर धावणार आहे. या कोचची देखभाल आणि दुरुस्ती राजस्थानमध्ये करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील रेल्वेप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच रुळांवर धावणार आहे. 'मेक इन लातूर' अंतर्गत तयार झालेली ही आधुनिक ट्रेन प्रवाशांना अधिक आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देणार आहे.
कधी धावणार स्लीपर वंदे भारत?
या नव्या वंदे भारत कोचची निर्मिती मराठवाड्यातील लातूर येथे केली जात आहे, तर त्याची देखभाल आणि दुरुस्ती राजस्थानातील जोधपूर येथे केली जाणार आहे. लातूरमध्ये तयार होणारा हा स्लीपर कोच पूर्णपणे 'मेक इन इंडिया' उपक्रमाअंतर्गत देशात बनवला जात आहे. जून महिन्यापासून या नव्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे रुळांवर आगमन होणार असून त्याची देखभालसाठी जोधपूरमध्ये अत्याधुनिक डेपो उभारला जात आहे.
advertisement
प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो तर्फे महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी राजस्थान अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यारम्यान पत्रकारांना जोधपूरमधील “भगत की कोठी” या रेल्वेच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या देखभाल आणि दुरुस्ती केंद्राला भेट देण्याची संधी मिळाली. हे केंद्र खास वंदे भारत स्लीपर कोचसाठी तयार होत आहे आणि देशातील पहिले असे केंद्र ठरणार आहे.
advertisement
या केंद्रात ट्रेनच्या देखभाल, स्वच्छता, यांत्रिक तपासणी आणि तांत्रिक दुरुस्ती यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. प्रकल्पाशी संबंधित अधिकारी अमित स्वामी यांनी सांगितले की, या केंद्राच्या विकासात रशियन कंपनी तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत आहे.
देशभरात अशा प्रकारचे आणखी चार डेपो उभारण्याचे नियोजन भारतीय रेल्वेने केले आहे. त्यात दिल्लीतील ब्रिजबासन आणि आनंदविहार, बंगळुरू तसेच मुंबईच्या वाडीबंदर येथील डेपोचा समावेश आहे. या सर्व डेपोमुळे वंदे भारत स्लीपर ट्रेनची देखभाल अधिक सुलभ आणि कार्यक्षम होणार आहे.
advertisement
जोधपूर डेपोचे काम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार असून पहिला टप्पा आगामी काही महिन्यांत संपणार आहे. दुसरा टप्पा जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथे एकाच वेळी अनेक वंदे भारत स्लीपर ट्रेनचे मेंटेनन्स आणि तपासणीचे काम होऊ शकेल.
‘मेक इन लातूर’ या घोषवाक्याखाली तयार होणारा वंदे भारत स्लीपर कोच केवळ प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास देणार नाही तर देशातील रेल्वे तंत्रज्ञानातही मोठा बदल घडवणार आहे. महाराष्ट्रातील लातूर येथे हा कोच तयार होत असल्याने राज्यासाठीही ही मोठी गौरवाची बाब मानली जात आहे.
advertisement
या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेला दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी आधुनिक, सुरक्षित आणि जलदगती स्लीपर ट्रेन उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर सुविधा, अत्याधुनिक डिझाईन आणि उच्च दर्जाचे तांत्रिक मानक हे या नव्या स्लीपर वंदे भारतचे खास आकर्षण ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 11:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Vande Bharat : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! स्लीपर वंदे भारतची होणार लवकर सुरुवात, जाणून घ्या कधीपासून धावणार?


