दारात आजीची वाट पाहत होता, दबा धरलेल्या बिबट्याची झडप; दारातून चिमुकल्याला ओढून...
- Published by:Prachi Amale
- Reported by:Harish Dimote
Last Updated:
प्रशासनाने अनेक उपाययोजना राबवल्या असल्या तरीही अद्यापही गावात येणाऱ्या बिबट्यांचं प्रमाण काही केल्या कमी झाल्याचं दिसत नाही.
अहिल्यानगर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी बिबट्यांनी हल्ले केले. पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत या घटना मोठ्या प्रमाणात होताना दिसल्या. विधिमंडळाचं अधिवेशन 8 डिसेंबरला सुरू झाल्यापासून नागपूरमध्येच दोनवेळा, तर रायगड आणि बीडमध्येही बिबट्या नागरी वस्तीत आल्याच्या घटना घडल्या. दरम्यान संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका चार वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. आज सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती त्याचवेळी चार वर्षीय चिमुकला सिद्धेश सूरज कडलग हा घराच्या दारात उभा होता, हीच संधी साधत गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सिद्धेशला जागेवरच ठार केले. त्यानंतर त्याच्या वडिलांसह आजीने एकच आक्रोश केला.मात्र बिबटयाच्या हल्यात चिमुकल्याचा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
advertisement
बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे गावात दहशतीचे वातावरण
मनुष्यवस्तीत सातत्याने नागरिकांवर होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर जीव घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, त्याला यश येत नव्हते. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहे. प्रशासनाने अनेक उपाययोजना राबवल्या असल्या तरीही अद्यापही गावात येणाऱ्या बिबट्यांचं प्रमाण काही केल्या कमी झाल्याचं दिसत नाही.
advertisement
प्रशासन काही कारवाई करणार का?
वन विभागाने या बिबट्याचा शोध घेतला असून त्याला पकडण्यासाठी पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. परिसरात 24 तास गस्त वाढवण्यात आली आहे. मात्र या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात कामाला जायचे की नाही असा प्रश्न गावातल्या लोकांना पडला आहे. या भागात अनेक वेळा बिबट्याचे दर्शन होते. शिवाय ते लोकांवर हल्ले ही करत आहेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याची मागणी गावकरी वारंवार करत आहेत. त्यामुळे या घटनेनंतर तरी प्रशासन काही कारवाई करणार का असा प्रश्न गावकरी करत आहेत.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 13, 2025 10:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दारात आजीची वाट पाहत होता, दबा धरलेल्या बिबट्याची झडप; दारातून चिमुकल्याला ओढून...











