Emotional VIDEO| कुणी उपाशी तर कुणी तहानलेलं, 32 तास ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्यांसाठी लोणावळा पोलीस बनले देवदूत
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लोणावळा पोलीसांनी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील गॅस टँकर अपघातानंतर अडकलेल्या प्रवाशांना स्वतःच्या खर्चाने पाणी व बिस्किटे वाटली, सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.
लोणावळा: पोलीस म्हटलं की आधीच भीती वाटते, काहींचं पोलिसांबद्दलचा अनुभव आणि मत चांगलंही नाही, ते त्रास देतात असं म्हणतात, पण तेच पोलीस प्रत्येक संकटात ढाल बनून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभे राहतात हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. जिथे लोक 32 तास उपाशी होते, पाणीही मिळणं कठीण होते, खाणं आणि पाणी विकण्यासाठी आलेले विक्रेते दुपटीनं पैसे घेत होते तिथे पोलिसांनी स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून लोकांना मदत केली आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर गॅसचा टँकर उलटला आणि पाहता पाहता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जवळपास 27 ते 30 तास उलटले, पण रस्ता मोकळा होण्याचे नाव घेईना. अनेक प्रवासी एकाच जागी अडकून पडले होते. काचांच्या आड अडकलेला श्वास आणि डोळ्यांत साचलेला थकवा, अशा परिस्थितीत अडकलेल्या लोकांसाठी लोणावळा पोलीस देवदूतासारखे धावून आले. त्यांनी या लोकांना मदत केली.
advertisement
गाड्यांच्या गर्दीत अडकलेल्या लहान मुलांची अवस्था सर्वात वाईट होती. कोणाकडे पिण्याचे पाणी संपलं होतं, भुकेनं लोक व्याकूळ झाले होते. उन्हाचा चटका आणि एसी बंद असल्यामुळे घामाघूम झालेली लहान मुले आणि वृद्ध स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा त्रास पाहून लोणावळा पोलीस मदतीला धावले. या कठीण काळात लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन मदतीसाठी सरसावले.
advertisement
advertisement
हायवेवर उभ्या असलेल्या प्रत्येक गाडीपर्यंत पोहोचून पोलिसांनी तहानलेल्या प्रवाशांना पाण्याचं वाटप केलं. रडणाऱ्या लहान मुलांच्या हातात जेव्हा पोलिसांनी बिस्किटांचे पुडे दिले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. एका बाजूला वाहतूक कोंडी सोडवण्याचं आव्हान आणि दुसऱ्या बाजूला भुकेल्या-तहानलेल्या प्रवाशांची काळजी, अशा दुहेरी भूमिकेत लोणावळा पोलीस दिसले. पोलिसांनी दिलेलं पाणी किंवा बिस्कट हे तहान किंवा भूक भागवण्याचं साधन नव्हतं तर त्यांनी दिलेला एक मोठा आधार होता.
advertisement
लोणावळा पोलिसांचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. पोलीस सदैव संरक्षणासाठी, मदतीसाठी आहेत हे पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कामातून दाखवून दिलं आहे. सर्वसामान्य लोकांसाठी लहान मुलांसाठी ते पुन्हा एकदा देवदूत बनून आले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 8:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Emotional VIDEO| कुणी उपाशी तर कुणी तहानलेलं, 32 तास ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्यांसाठी लोणावळा पोलीस बनले देवदूत








