Eknath Shinde Shiv Sena: महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय सांगतात
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde Shiv Sena: नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत राज्याच्या राजकारणात आपली ताकद ठसठशीतपणे दाखवून दिली आहे.
मुंबई: राज्यातील नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून अपेक्षे प्रमाणे भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाने आपला स्ट्राइक रेट चांगलाच राखला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजप विरोधातील थेट लढतीत इतरांच्या मदतीने विजय मिळवला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी आपआपले गड राखल्याचे निकालात दिसून आले आहे. भाजपने कोकणवर आपला दावा सांगितला असताना दुसरीकडे शिंदे गटाने कोकणातही चांगली कामगिरी केली आहे. कणकवली आणि मालवणमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला आहे.
advertisement
नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत राज्याच्या राजकारणात आपली ताकद ठसठशीतपणे दाखवून दिली आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगरपरिषदेत २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवत २१–० असा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’ केला आहे. या एकतर्फी निकालामुळे माधवी भुटाला नगराध्यक्षा पदावर विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सांगोला नगरपालिकेत वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यात निवडणुकीपूर्वी जोरदार आरोप–प्रत्यारोप झाले होते. शहाजी बापू पाटील यांच्याविरोधात भाजपने विरोधकांची मोट बांधली होती. या पार्श्वभूमीवर शहाजी बापूंनी राजकीय ताकद दाखवत जयकुमार गोरेंना ‘क्लीन स्वीप’ दिला. सांगोल्यात दोन जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित १७ जागांवर शहाजी बापू पाटील यांच्या गटाने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं.
advertisement
महाड नगरपालिकेतही शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील संघर्ष चांगलाच पेटला होता. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप दिसून आले. अखेर भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विजय मिळवला, यामुळे या लढतीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
या निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाने आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे. शिवसेनेने आपल्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक जागा लढवत संघटनात्मक ताकद दाखवली. जवळपास १३५ ठिकाणी शिवसेनेने निवडणूक लढवली, त्यापैकी ५० पेक्षा अधिक ठिकाणी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, स्वबळावर लढूनही शिवसेनेने उत्तम ‘स्ट्राईक रेट’ साध्य केला आहे. ठाकरे गटाच्या तुलनेत शिवसेनेने तब्बल पाच पट अधिक जागा जिंकल्या असून, महाविकास आघाडीला एकत्रितपणे जितक्या जागा मिळाल्या नाहीत, त्यापेक्षा अधिक जागा शिवसेनेच्या पारड्यात पडल्या आहेत.
advertisement
>> भाजपवर शिंदे गटाची कुरघोडी, थेट धोबीपछाड...
भाजप आणि शिंदे गटाने काही नगर परिषदांमध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. यामध्ये शिंदे गटाने भाजपला धोबीपछाड दिला. कणकवली, मालवणमध्ये भाजपच्या नितेश राणेंना धक्का देत विजय मिळवला. कणकवलीत शहर विकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. तर, पालघर-डहाणू नगर परिषदेत बाजी मारली. या ठिकाणचे विजय खास ठरले. पालक मंत्री गणेश नाईक यांना धक्का बसला असल्याचे सांगण्यात येते. सांगोलामध्येही शिंदे सेनेने बाजी उलटवली.
advertisement
>> कोणत्या नगरपरिषदेत शिंदे गटाचा विजय?
कणकवली
मालवण
पालघर
डहाणू
सांगोला
महाड
मुरगूड
जयसिंगपूर,
हातकणंगले,
कुरुंदवाड
जुन्नर
मंचर
राजगुरुनगर
चाकण
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 2:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Shiv Sena: महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय सांगतात










