Sangli News Maharashtra Politics : महायुतीचे 'मिशन सांगली', महाविकास आघाडीचा बालेकिल्ला फुटणार?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Politics Sangli : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी 'मिशन सांगली' मोहीम सुरू केली आहे. सत्ताधारी महयुतीमधील नेत्यांच्या या हालचालींमुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंता वाढली आहे.
ज्ञानेश्वर साळोखे, असिफ मुरसळ, सांगली: एकेकाळी महाविकास आघाडीचा बालेकिल्ला समजला जाणारा सांगली जिल्हा आता महायुतीच्या रडारवर आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी 'मिशन सांगली' मोहीम सुरू केली आहे. सत्ताधारी महयुतीमधील नेत्यांच्या या हालचालींमुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंता वाढली आहे.
अजितदादांनी खेचले 4 माजी आमदार...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच सांगलीतील चार माजी आमदार अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप आणि राजेंद्र देशमुख – यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश दिला. हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील मजबूत चेहरे होते. त्यांचा पक्षांतराचा निर्णय हे सांगलीतील राजकारणात एक मोठे पाऊल मानले जात आहे.
advertisement
खासदार विशाल पाटलांना ऑफर!
या घडामोडीनंतर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यमान काँग्रेसचे सहयोगी अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपात सामील होण्याची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे, विशाल पाटील यांचे मंत्रिपदाची अपेक्षा असलेले वक्तव्य समोर आले होते. त्यावरून चर्चेला उधाण आले आहे. त्यानंतर सांगलीतील राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले आहे.
advertisement
शिंदे गटाच्या रडारवर ठाकरेंचा शिलेदार
एकीकडे सांगलीत राष्ट्रवादी आणि भाजप आपली पावले टाकत असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेदेखील आपला डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः सांगली दौऱ्यावर येऊन ठाकरे गटाचे शिलेदार चंद्रहार पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. दिल्लीतही या दोघांची भेट झाल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. यामुळे महायुती सांगलीतील प्रत्येक महत्त्वाच्या नेत्यावर लक्ष केंद्रित करून त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.
advertisement
जयंत पाटील, विश्वजित कदमांसमोर आव्हान...
या सगळ्या हालचालींमुळे महाविकास आघाडीतील नेते जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सांगली जिल्ह्यात पतंगराव कदम, आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांसारख्या नेत्यांनी जे राजकीय बळ उभं केलं, त्यावर आता महायुतीने सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सांगली जिल्ह्यात महायुती यश मिळवते की आघाडी पुन्हा ताकद दाखवते, हे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट होईल. मात्र, 'मिशन सांगली'मुळे जिल्ह्याचे राजकारण सध्या तापले आहे.
Location :
Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
First Published :
May 01, 2025 1:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangli News Maharashtra Politics : महायुतीचे 'मिशन सांगली', महाविकास आघाडीचा बालेकिल्ला फुटणार?