मुंबईहून गणेशोत्सवासाठी सकाळी गावी आले, दुपारी घराला लागली आग; वृद्धाचा मृत्यू, पत्नी जखमी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मुंबई येथे वास्तव्यास असलेले प्रभाकर माने आपल्या पत्नीसह मुंबई येथून गणेशोत्सव निमित्त मसुरे येथे आले होते आणि ही दुर्दैवी घटना घडली.
विशाल रेवडेकर, प्रतिनिधी
मालवण : मालवण तालुक्यातील मसुरे मेढावाडी येथील आग लागून घर भस्मसात झालं. या आगीत प्रभाकर माने यांचा मृत्यू झाला तर पत्नी शुभदा माने गंभीर जखमी झाल्या आहेत. शुभदा यांच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजले नाही. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई येथे वास्तव्यास असलेले प्रभाकर माने आपल्या पत्नीसह मुंबई येथून गणेशोत्सव निमित्त मसुरे येथे आले होते आणि ही दुर्दैवी घटना घडली.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रभाकर माने हे सोमवारी सकाळीच मुंबईतून गावी आले होते. दुपारी जेवण आटोपल्यानंतर ते खोलीत विश्रांती घेत होते. तेव्हा शेजाऱ्यांना माने यांच्या घरातून धूर येत असल्याचं दिसलं. सुरुवातीला ही आग घराच्या छपराला लागल्याचं वाटत होतं. शेजारच्या लोकांनी घरात धाव घेत माने दाम्पत्याला बाहेर येण्यास सांगितलं. पण प्रभाकर माने हे बाहेर पडू शकले नाहीत. तर शुभदा माने धावत बाहेर येताना अंगणात पडून जखमी झाल्या.
advertisement
शुभदा माने यांना उपचारासाठी ओरोस इथं पाठवण्यात आलं. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आल्यानंतर एका खोलीत प्रभाकर माने हे गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं पण तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
advertisement
घराच्या छपराला आग लागली आणि त्याची झळ इतर घरांनाही बसली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. माने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2024 11:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईहून गणेशोत्सवासाठी सकाळी गावी आले, दुपारी घराला लागली आग; वृद्धाचा मृत्यू, पत्नी जखमी