Maratha Protest : मराठा आंदोलनाचा तिसरा दिवस, समाज बांधवांकडून आंदोलकांना मोठी रसद, सीएसएमटी परिसरात अन्न-पाण्याचा पुरवठा
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maratha Morcha Mumbai : या मराठा आंदोलकांसाठी राज्यातील विविध भागातून रसद पुरवठा होऊ लागला आहे. सामाजिक संस्थांकडूनही अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
मुंबई: मुंबईत सुरू असलेले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. अन्न-पाण्याची, पावसाची तमा न बाळगता लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दोन दिवसांपासून अत्यंत चिवटपणे आरक्षणाच्या मु्द्यावर आंदोलन सुरू आहे. आता, या मराठा आंदोलकांसाठी राज्यातील विविध भागातून रसद पुरवठा होऊ लागला आहे. सामाजिक संस्थांकडूनही अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
advertisement
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनकर्त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून अन्न व पाण्याचा पुरवठा मुंबईत पोहोचत असून, सीएसएमटी परिसरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात रसद वाटप सुरू झाले आहे.
मराठा बांधवांनी आपल्या परीने आंदोलकांना साथ देण्याचे ठरवले आहे. यासाठी खासगी वाहनं, ट्रक, मिनी ट्रक, पिकअप व्हॅनमधून अन्न, पाणी आणि फळांचा साठा थेट मुंबईत आणण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासूनच सीएसएमटी परिसरात आंदोलकांना जेवणाचे डबे, बिस्कीट पाकिटं, पाण्याच्या बाटल्या, तसेच फळांचे वाटप करण्यात येत आहे.
advertisement
राज्यभरातील कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि स्थानिक मराठा बांधव हे आंदोलनकर्त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी पुढे सरसावले आहेत. मुंबई महापालिकेच्यावतीने देखील वैद्यकीय, पाणी आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सीएसएमटी, चर्चगेट परिसरातील खाऊगल्ली बंद होती. त्यामुळे आंदोलकांचे हाल झाले होते. त्यानंतर राज्यातून रसद सुरू झाली आहे.
advertisement
सीएसएमटी परिसरात मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते जमले असून, त्यांच्यासाठी ही मदत जीवनदायी ठरत आहे. "मुंबईतल्या आंदोलकांना उपाशी ठेवणार नाही," या निर्धाराने ग्रामीण भागातील लोकांनी आपापल्या परीने रसद जमा करून थेट गाड्यांमधून मुंबईत पाठवली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र होत असताना, आंदोलकांच्या मागे राज्यातील मराठा समाज एकजूट दाखवत आहे. आंदोलनकर्त्यांचा उत्साह आणि मनोबल वाढविण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतून या रसद पुरवठ्याला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
advertisement
कळंबहून मुंबईला चटणी-भाकरीची शिदोरी मुबंईकडे रवाना
धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथून मुंबईला खाद्यसामग्रीची 'रसद' पुरवली जात आहे. घरोघरी थापलेल्या भाकरी, कांदा-चटणी, बिस्किटे ते अगदी औषधी इथवरचं साहित्य घेऊन शनिवारी रात्री तब्बल तीन मालवाहू वाहने मुंबईकडे रवाना झाली आहेत. मुंबईत आंदोलनासाठी गेलेल्या मराठा बांधवांसाठी गावागावातून आता चटणी भाकरी बिस्किट चिवडा यासारखे साहित्य मुंबईला पुरवले जात आहे जोपर्यंत आरक्षणाचा हा लढा सुरू आहे तोपर्यंत हे साहित्य पुरवले जाणार असल्याचा निर्धार मराठा समाज व मराठा समाजाला सहकार्य करणाऱ्या इतर बांधवांनी घेतला आहे. तर, नवी मुंबईतही मराठा बांधवांकडून आंदोलकाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2025 8:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Protest : मराठा आंदोलनाचा तिसरा दिवस, समाज बांधवांकडून आंदोलकांना मोठी रसद, सीएसएमटी परिसरात अन्न-पाण्याचा पुरवठा