अन्नपदार्थात भेसळ करताना सापडला तर थेट मकोका लागणार, मंत्री झिरवाळांची घोषणा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अन्न पदार्थाच्या भेसळीसंदर्भात शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी विधान परिषदे प्रश्न उपस्थित केला होता.
मुंबई : अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील अन्नसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक व्यापक करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
भेसळ करताना सापडला तर थेट मकोकाची कारवाई
शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी याविषयी विधान परिषदेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भाई जगताप, ॲड. अनिल परब, अमोल मिटकरी आणि कृपाल तुमाने यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध थेट मकोकाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
advertisement
दुधातील भेसळ प्रकरणी १४ जणांवर गुन्हे
मंत्री झिरवाळ म्हणाले, वसई आणि अंधेरी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात दुधातील भेसळ प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार जणांना तडीपार करण्याची कार्यवाही सुरू आहे.
दूध पुरवठ्यावर लक्ष, सुगंधित सुपारी प्रश्नाच्या संदर्भातही लवकरच बैठक
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, मुंबईसह मोठ्या शहरांत बाहेरून येणाऱ्या दूध पुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढीसाठीही शासन प्रयत्नशील आहे. विभागाकडील पद भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विभागात अलीकडेच अन्न व औषध प्रशासन विभागात १९७ कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना प्रशिक्षणानंतर पदस्थापना देण्यात आली असल्याचेही मंत्री झिरवाळ म्हणाले. सुगंधित सुपारी प्रश्नाच्या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, असेही मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 7:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अन्नपदार्थात भेसळ करताना सापडला तर थेट मकोका लागणार, मंत्री झिरवाळांची घोषणा







