Mumbai Metro: आता एकाच तिकीटावर कोणत्याही मेट्रोत फिरा! एमएमओपीएलनं घेतला मोठा निर्णय
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Mumbai Metro: सध्या मुंबईत चार मेट्रो मार्गिकांवर वाहतूक सुरू आहे. लाखो प्रवासी या सेवेचा लाभ घेतात.
मुंबई: लोकलसोबतच आता मेट्रोचं महत्त्व देखील हळूहळू वाढत आहे. लोकलवरील प्रवासी भार कमी व्हावा आणि वाहतूक कोडींची समस्या कमी व्हावी, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रोचं जाळं विस्तारण्याचं काम सुरू आहे. सध्या मुंबईत चार मेट्रो मार्गिकांवर वाहतूक सुरू आहे. लाखो प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. या प्रवाशांसाठी आता मेट्रोने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता एकाच तिकीटावरून चारही मट्रो मार्गिकांमधून प्रवास करता येणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) 'वन तिकीट' अॅप लाँच केलं आहे. एमएमओपीएल घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो 1चं संचलन करते. मेट्रो प्रवाशांना एकाच दिवसात दोन किंवा त्यापेक्षा अधिक मार्गिकांवरून प्रवास करायचा असल्यास त्यांना या अॅपवरून एकच तिकीट खरेदी करता येणार आहे. भविष्यात आणखी नवीन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार असून या मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी देखील या अॅपवर तिकीट उपलब्ध होणार आहे.
advertisement
एमएमओपीएलने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना प्ले स्टोअरवर 'वन तिकीट' अॅप डाऊनलोड करता येईल. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा वापर करता येईल. हे अॅप वापरण्यास अतिशय सोपं असून त्यावरून जवळचं मेट्रो स्टेशन गुगलद्वारे आपोआप निवडलं जातं. या अॅपमुळे विविध मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळं तिकीट खरेदी करण्याची गरज राहणार नाही.
advertisement
मेट्रो3चं संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) जून 2025 मध्ये मेट्रो3 साठी हे अॅप कार्यान्वित केलं होतं. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता एमएमओसीएलने या अॅपची सुधारित आवृत्ती कार्यान्वित केली आहे.
सध्या मेट्रो 1 सह दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ, दहिसर गुंदवली मेट्रो 7 आणि आरे आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक भुयारी मेट्रो 4 या चार मेट्रो मार्गिका सेवेत दाखल आहेत. दरवर्षी किमान 50 किमीची मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिलं आहे. त्यामुळे सध्या वाहतूक सेवेत असलेले 70 किमी मेट्रोचं जाळं येत्या काही वर्षांतच 270 किमी आणि पुढे 337 किमीवर पोहचणार आहे. प्रत्येक मेट्रो मार्गिका जवळच्या दुसऱ्या मेट्रो मार्गिकेशी जोडली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात एका मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेचा वापर करून प्रवाशांना इच्छितस्थळ गाठाता येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 9:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Metro: आता एकाच तिकीटावर कोणत्याही मेट्रोत फिरा! एमएमओपीएलनं घेतला मोठा निर्णय