Mumbai Metro: 7 वर्षांनी झाली बॅरिकेट्सपासून सुटका, मेट्रो 3 लाईनवरील 19 स्टेशन्सनी घेतला मोकळा श्वास
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Mumbai Metro: मेट्रो-3 या 33 किलोमीटर लांबीच्या भुयारी लाईनच्या कामाला 2016 मध्ये सुरुवात झाली होती.
मुंबई : वाहतूक कोंडी आणि लोकलमधील गर्दीची समस्या कमी करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं काम सुरू आहे. कुलाबा ते सीप्झ हा भुयारी मेट्रो-3 प्रकल्प देखील या अंतर्गत येतो. मात्र, या प्रकल्पाच्या कामासाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेट्स मुंबईकरांसाठी अडथळा ठरत होते. हा अडथळा जवळपास नाहीसा झाला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) कफ परेड ते आरे या भुयारी मेट्रो 3 लाईनवरील 90 टक्के बॅरिकेड्स हटवून स्टेशनबाहेरचे रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले आहेत.
'एमएमआरसी'ने मेट्रो 3च्या कामासाठी कफ परेड ते आरेदरम्यान सुमारे 22.71 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले होते. या बॅरिकेड्समुळे 10 ते 20 मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तासभर वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागत होतं. त्यामुळे 'एमएमआरसी'वर अनेकदा टीकाही झाली. आता बहुतांशी रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. त्यामुळे या मेट्रो लाईनवर असलेल्या स्टेशनच्या भागातून वाहनांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहेत.
advertisement
कुलाबा ते सीप्झ मेट्रो-3 या 33 किलोमीटर लांबीच्या भुयारी लाईनच्या कामाला 2016 मध्ये सुरुवात झाली होती. या लाईनवर 27 स्टेशन्स आहेत. 'एमएमआरसी'च्या तेव्हाच्या नियोजनानुसार या मेट्रो लाईनचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा जून 2012 पर्यंत, तर कफ परेड ते बीकेसी हा दुसरा टप्पा जानेवारी 2022 पर्यंत सुरू केला जाणार होता. पण, विविध कारणांनी हा प्रकल्प रेंगाळला. परिणामी या मार्गावरील बॅरिकेड्स हटवण्यासाठीही विलंब झाला. गेल्या 7 वर्षांपासून मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.
advertisement
सध्या धारावी, बीकेसी, आचार्य अत्रे चौक या मेट्रो स्टेशनच्या काही भागातच बॅरिकेड्स आहेत. गिरगाव, काळबादेवी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड या भागातही काही ठिकाणी बॅरिकेड्स आहेत. हे रस्ते देखील लवकरच पूर्ववत केले जातील, अशी माहिती एमएमआरसीने दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 11:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Metro: 7 वर्षांनी झाली बॅरिकेट्सपासून सुटका, मेट्रो 3 लाईनवरील 19 स्टेशन्सनी घेतला मोकळा श्वास