आधी नाशिक मग नागपूर, भाजपात हाय होल्टेज ड्रामा, कार्यकर्त्यांनी थेट नेत्यांना ठेवलं डांबून
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिक आणि नागपूरमध्ये तर भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक बघायला मिळाला आहे. इथं भाजपच्या कार्यकर्त्याने थेट आपल्याच पक्षाच्या नेत्याला आणि बंडखोर उमेदवाराला चक्क डांबून ठेवल्याचं समोर आलं आहे.
महानगर पालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पक्षातील बंडोबांना थंड करण्याचं मोठं आव्हान सर्वच पक्षांवर आहेत. काही जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र अजून बरेच जण निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. पक्षांतर्गत होणाऱ्या बंडखोरीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजपला बसताना दिसत आहे. आयारामांना तिकीट दिल्याने अनेक ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहेत.
नाशिक आणि नागपूरमध्ये तर भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक बघायला मिळाला आहे. इथं भाजपच्या कार्यकर्त्याने थेट आपल्याच पक्षाच्या नेत्याला आणि बंडखोर उमेदवाराला चक्क डांबून ठेवल्याचं समोर आलं आहे. बराच वेळ ऑन कॅमेरा राजकीय ड्रामा झाल्यानंतर दोघांचीही सुटका करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये निष्ठावंतांना डावलल्याच्या रागातून भाजपच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी नाशिकचे शहराध्यक्ष सुनील केदार आणि मंडलाध्यक्ष शांताराम घंटे यांना नाशिकरोड येथील पक्ष कार्यालयात चक्क डांबून ठेवले. गेल्या तीन वर्षांपासून पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून, ऐनवेळी पक्षात आलेल्यांना आयारामांना 'एबी' फॉर्म दिल्याचा आरोप नाराज इच्छुकांनी केला. नाराज कार्यकर्त्यांनी सुरुवातीला शहराध्यक्ष सुनील केदार यांना गाजर दाखवत त्यांचा निषेध केला. "जर तिकीट द्यायचे नव्हते, तर तसे आधीच स्पष्ट करायला हवे होते. ऐनवेळी विश्वासघात का केला?" असा सवाल करत कार्यकर्त्यांनी केदार आणि घंटे यांना घेराव घातला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांना कार्यालयात नेऊन कार्यकर्त्यांनी शटर ओढून घेतले. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही नेत्यांची सुटका करण्यात आली.
advertisement
दुसरीकडे नागपुरात देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीच नाट्यमय आणि धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. भाजपच्या बंडखोर उमेदवाराने अर्ज माघारी घेऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांना थेट घरातच कोंडून ठेवलं. प्रभाग क्रमांक १३ ड मधील उमेदवार किसन गावंडे यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांच्या परिसरातील नागरिक आणि समर्थकांनी थेट त्यांनाच घरात बंद केलं आणि बाहेरून कुलूप लावलं.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग १३ ड मधून भाजपकडून किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, नंतर पक्षाने रणनीतीत बदल करत किसन गावंडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या. वेळेवर अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आल्याने गावंडे यांची भाजपकडील अधिकृत उमेदवारी रद्द झाली असून, ते सध्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
advertisement
पक्षाकडून अर्ज मागे घेण्याचा दबाव वाढताच, गावंडे यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. परिसरातील नागरिक आणि समर्थकांनी किसन गावंडे यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेऊ नये, असा ठाम आग्रह धरला. याच पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना, गावंडे यांना बाहेर जाऊन अर्ज मागे घेता येऊ नये म्हणून समर्थकांनी त्यांच्या घराला कुलूप लावल्याची माहिती समोर आली आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 1:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी नाशिक मग नागपूर, भाजपात हाय होल्टेज ड्रामा, कार्यकर्त्यांनी थेट नेत्यांना ठेवलं डांबून









