आता पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट होणार बंद, पेट्रोलियम संघटनेचा मोठा निर्णय
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद करण्याबाबत पेट्रोलियम संघटनेनं मोठा निर्णय घेतला आहे. १० मे पासून हा निर्णय अमलात आणला जाणार आहे.
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी नागपूर: गेल्या काही वर्षात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात डिजीटल आणि यूपीआय पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ५-१० रुपयांसाठी देखील डिजीटल पेमेंट केलं जात आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आता कॅशमध्ये पैसे बाळगणं जवळपास बंद केलं आहे. अगदी जेवणाच्या बिलापासून पेट्रोल पंपापर्यंत सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशात आता विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे.
नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवार 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजीटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही, असा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतला आहे. मागच्या काही काळात सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सायबर फसवणुकीच्या घटनांमुळे तपास यंत्रणांकडून अनेकदा पेट्रोलपंप धारकांची बँक खात्यातील रक्कम गोठवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला.
advertisement
खरं तर, सद्यस्थितीत देशभरात डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात. काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे. काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत. संबंधित खात्यांतील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशा शिवाय परत मिळवता येत नाही. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
advertisement
या समस्येवर लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजीटल पेमेंट बंद करण्याचा विचार पेट्रोलियम संघटना करत आहेत. विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने डिजीटल पेमेंट बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा ग्राहकांवर परिणाम होणार हे निश्चित आहे. डिजीटल इंडियासाठी आग्रही असलेल्या सरकारकडून या निर्णयासंबंधी कोणती भूमिका घेतली जाते? हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
May 04, 2025 8:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
आता पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट होणार बंद, पेट्रोलियम संघटनेचा मोठा निर्णय








