विदर्भात उष्णतेमुळे जीवाची काहिली, तापमानात झपाट्याने वाढ
- Published by:News18 Marathi
Last Updated:
राज्यातून मोसमी वारे माघारी फिरताच तापमानात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
नागपूर, 10 ऑक्टोबर: राज्यातून मोसमी वारे माघारी फिरताच तापमानात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आज मंगळवार 10 ऑक्टॉबर रोजी विदर्भातील अकोला येथे 36.5 अंश सेल्सिअस इतक्या राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 'ऑक्टोबर हीट'मुळे विदर्भवासीयांच्या अंगाची काहिली होत आहे. पुढील काही दिवस उष्णतेच्या झळा कायम राहण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. मोसमी वारे माघारी फिरताच राज्यात तापमान वाढीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. राज्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता.
ऑक्टोबरमध्ये राज्याच्या बहुतेक भागांतून मोसमी वारे माघारी जात उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भात मागील दोन दिवस सरासरी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसवर होते. सोमवारी त्यात आणखी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर आज नागपुरातील कमाल तापमान 35.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.6 अंश सेल्सिअस असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या मान्सून मोसमात विदर्भातील पर्जन्यमापात केवळ दोनच टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली असून ती सामान्य असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
advertisement
पर्जन्यमान कमीच
पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे बरेच नुकसान झाले आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात दांडी मारून बसलेला पाऊस सप्टेंबर मध्ये दमदार बरसला. यंदाच्या मोसमात अकोला व अमरावती जिल्ह्यातील पर्जन्यमानात अनुक्रमे 23 व 27 टक्के तूट नोंदविण्यात आली. तर यवतमाळ येथे सर्वाधिक 14 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात यंदा 5 टक्के अतिरिक्त पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
किती आहे तापमान?
मान्सून परतल्यामुळे वातावरण कोरडे होऊ लागले आहे, त्यामुळे दिवसा चांगले ऊन पडू लागले आहे. तर रात्री सुद्धा आकाश निरभ्र असल्याने वातावरणात गारवा जाणवत आहे. नागपूर शहरात आज किमान तापमान 35.4 ते किमाल तापमान 19.9 असे नोंदविण्यात आले आहे. तर भंडारा कमाल 35.3 आणि किमान 22.3, गोंदिया कमाल 35.4 तर किमान 21.9 आहे. गडचिरोली कमाल 35.2 तर किमान 22.4 अंश सेल्सिअस आहे. चंद्रपूर कमाल 35.4 तर किमान 23.6 आहे.
advertisement
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान 35.7 तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस आहे. वाशिम जिल्ह्यात कमाल 35.0 तर किमान तापमान 19.8, बुलढाणा जिल्ह्यात कमाल 34.0 तर किमान 20.7, अमरावती जिल्ह्यात कमाल 35.6 तर किमान तापमान 20.7 अंश सेल्सिअस आहे. वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान 36 तर किमान तापमान 22.2 अंश सेल्सिअस आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 10, 2023 11:10 AM IST


