माजी विरोधी पक्षनेत्याचं अपहरण, बेदम मारहाण, अजित पवारांच्या आमदारावर गंभीर आरोप, सात जणांना अटक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नांदेड शहरात सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरणाच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: नांदेड शहरात सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरणाच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, घोगरे पाटील यांनी थेट राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
गाडीत कोंबून नेलं, बेदम मारहाण केली
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जीवन घोगरे पाटील हे सिडको भागातून आपल्या गाडीने जात होते. यावेळी एका स्कार्पिओ गाडीने त्यांचा पाठलाग करून त्यांची गाडी अडवली. स्कार्पिओमधून उतरलेल्या सहा ते सात जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांचं अपहरण केलं. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपहरणानंतर आरोपींनी घोगरे यांना अज्ञात ठिकाणी घेऊन जात बेदम मारहाण केली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. पोलिसांनी पाठलाग करून जीवन घोगरे पाटील यांची सुटका केली. अपहरण करणाऱ्या सात आरोपींना अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ गाडीही जप्त करण्यात आली.
राजकीय सूडबुद्धी आणि आर्थिक व्यवहाराचा आरोप
सुटका झाल्यानंतर जीवन घोगरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धक्कादायक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, "आमदार प्रताप पाटील चिखलीकर, त्यांचे पुत्र प्रवीण चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांनीच माझे अपहरण करायला लावले आणि मारहाण करायला सांगितली." 'चिखलीकर भावी मंत्री आहेत, त्यांच्या नादी लागू नकोस' अशी धमकी अपहरणकर्त्यांनी आपल्याला दिल्याची माहिती जीवन घोगरे यांनी दिली.
advertisement
यामागे दोन कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार आणि राजकीय हेतू असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण आणि मारहाणीत प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या सात जणांना अटक केली आहे. शुभम दत्ता सुनेवाड, राहुल मारोती दासरवाड, कौस्तुभ रमेश रणवीर, विवेक नरहरी सूर्यवंशी, माधव बालाजी वाघमारे, मोहंमद अफ्रोज फकीर ( चालक ) आणि देवानंद भोळे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
advertisement
पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर, प्रवीण चिखलीकर आणि मोहन हंबर्डे यांनी आरोपींना मारहाण करायला लावली, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, सध्या पोलिसांनी या आजी-माजी आमदारांना थेट आरोपी केलेले नसून, केवळ फिर्यादीच्या आरोपावरून तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 7:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माजी विरोधी पक्षनेत्याचं अपहरण, बेदम मारहाण, अजित पवारांच्या आमदारावर गंभीर आरोप, सात जणांना अटक








