'सारथी' अन् अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बंद होणार? नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
विशाल पाटील, प्रतिनिधी सातारा: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण असणारी 'सारथी संस्था' व 'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ' पद्धतशीरपणे आणि टप्प्याटप्प्याने कमजोर करून बंद करण्याचे षडयंत्र सरकारमधीलच मंत्र्यांकडून सध्या सुरू असल्याचा गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज प्रकरणे करणाऱ्यासाठी लागणारे पात्रता प्रमाणपत्र म्हणजेच एलवाय देणं बंद केले आहे. हा हे महामंडळ बंद पाडण्याचा कट असल्याचं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र पाटील यांनी काय आरोप केले?
सरकारने एलवाय देणं बंद केल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता नरेंद्र पाटील म्हणाले, "दीड लाख मराठा उद्योजक झाल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी केलं. ही चांगली बाब आहे. हे सरकारचं यश आहे. पण मागील काही दिवसांपासून या महामंडाळामध्ये ब्रेक लागला पाहिजे, मराठा व्यावसायिकांना एल वाय देऊ नका, अशा सूचना आमच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या आहेत. नवीन एल वाय देणं त्यांनी कायदेशीर बंद केलं आहे."
advertisement
"मला आधी सांगण्यात आलं की कॅम्प्युटर अपग्रेडेशन सुरू आहे. हे अपग्रेडेशन २४ तासांत होऊ शकतं. हे दिवाळीच्या काळात केलं जाऊ शकतं, असं मला वाटलं. कारण तोपर्यंत आपलं सगळं काम थंड असतं. पण मुद्दामहून दिवाळीच्या आधी बंद करण्यात आलं. आता दिवाळी झाली. दिवाळी होऊन एक महिना उलटला, तरी सुरू एलवाय देणं सुरू झालं नाही. त्यामुळे साहजिकच मराठा द्वेषीमंत्र्यांच्या सूचनेवरूनच महामंडळाला ब्रेक लावण्याचं काम केलं जात आहे" असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला.
advertisement
अजित पवारांवर आरोप करताना नरेंद्र पाटील म्हणाले, "आमचं महामंडळ नियोजन विभागाच्या अख्यातारित येतं, म्हणजे आम्हाला पैसे देणारे अजित पवार आहेत. त्यांचा एमडी हा त्यांच्याच विचारांचा असतो. त्यामुळे कळत न कळत अजित पवारांकडूनच या सूचना झाल्या असतील. आणि त्यांनी सूचना केल्या नसतील, तर मागच्या पंधरा दिवसात हा प्रश्न टीव्ही चॅनेलवर उपस्थित करण्यात आला होता. पण त्यांनी याबाबत काही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की सारथीसारख्या बऱ्याच योजना आता कमी करण्यात आल्या आहेत. महामंडळ आणि सारथी याला पैसे कमी द्या. योजनेला कसा ब्रेक देता येईल, ते बघा. विशेष म्हणजे मुख्यमंत्री व्याप्ती वाढवा म्हणतात आणि याच सरकारचा एक मंत्री ही योजना कशी बंद पाडता येईल, याचा कट रचतात, हे दुर्भाग्यपूर्ण आहे."
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
November 15, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'सारथी' अन् अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बंद होणार? नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप


