Nashik BJP : पक्षप्रवेशावरून भाजपात ‘महाभारत’! कार्यालयात आंदोलन, आमदारांची सोशल मीडियावर नाराजी
- Reported by:Laxman Ghatol
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Nashik BJP : नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. मात्र, त्यावरून भाजपात असंतोष उफाळून आला आहे.
नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधी भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. नाशकात भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विरोधकांना धक्का देणे सुरुच आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. मात्र, त्यावरून भाजपात असंतोष उफाळून आला आहे.
नाशिकच्या राजकारणात भाजपामध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याचे चित्र समोर आले आहे. माजी महापौर विनायक पांडे आणि काँग्रेसचे नेते, माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या भाजपातील पक्षप्रवेशावरून भाजपातच ‘महाभारत’ सुरू झाले आहे. या पक्षप्रवेशाला भाजप आमदार आणि निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी उघडपणे विरोध दर्शविल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार देवयानी फरांदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या नाराजीला स्पष्ट शब्दांत वाट मोकळी करून दिली आहे. मी नाशिकसाठी निवडणूक प्रमुख असताना, एवढ्या महत्त्वाच्या पक्षप्रवेशाबाबत मला विश्वासात घेतले गेले नाही, असा थेट आरोप फरांदे यांनी केला आहे. पक्षातील निर्णयप्रक्रियेत आपल्याला डावलण्यात आल्याची भावना त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केली आहे.
advertisement
विशेष म्हणजे, माजी महापौर विनायक पांडे आणि माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या प्रवेशालाच फरांदे यांनी विरोध केला आहे. भाजप हा तत्त्वांवर चालणारा पक्ष असून, वर्षानुवर्षे संघटनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. “प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी उभी आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
advertisement

भाजप आमदार देवयानी फरांदे यांची सोशल मीडियावरील पोस्ट
फरांदे यांच्या या स्पष्ट आणि आक्रमक भूमिकेमुळे नाशिक भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उघड झाले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बाब पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. एका बाजूला पक्ष विस्तारासाठी मोठ्या नेत्यांना प्रवेश दिला जात असताना, दुसरीकडे निष्ठावान कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातोय का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तर, या दुसरीकडे या पक्ष प्रवेशाच्या निर्णयाविरोधात भाजप कार्यालयासमोर नाराज भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलने केली.
advertisement
देवयानी फरांदे यांच्या पोस्टने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली असून, भाजपचे वरिष्ठ नेतृत्व या वादावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 11:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik BJP : पक्षप्रवेशावरून भाजपात ‘महाभारत’! कार्यालयात आंदोलन, आमदारांची सोशल मीडियावर नाराजी









