चाकुने वार झाले, कोथळा पकडून धावत होता तरुण पण.., नाशिकमध्ये रामरथ मिरवणुकीत रक्तरंजित कांड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर शहरात श्रीराम रथोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, रविवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर शहरात श्रीराम रथोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, रविवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली आहे. दुचाकी पार्किंगवरून झालेल्या अगदी किरकोळ वादातून एका तरुणाची चुलत भावाने हत्या केली आहे. त्याने चाकुने वार करत भावाचा जीव घेतला आहे. गौरव दशरथ जाधव (३९) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर त्याचा लहान भाऊ राकेश जाधव (३६) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. वावी वेस परिसरात रथाच्या मिरवणुकीपासून अवघ्या २०० फुटांवर हा थरार घडला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सिन्नरमध्ये श्रीराम रथाची मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत गर्दी असल्यामुळे वाहतुकीला अडथळा नको, या हेतूने गौरव जाधव यांनी आपली दुचाकी शेजारील नितीन जाधव यांच्या दुकानासमोर पार्क केली होती. मात्र, ही बाब संशयित आरोपी बंडू जाधव (४२) याला रुचली नाही. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली.
advertisement
वादाचे रूपांतर काही वेळातच भीषण हाणामारीत झाले. रागाच्या भरात बंडू जाधव याने घरातून धारदार चाकू आणला आणि गौरवच्या बरगडीत आणि बगलेत खोलवर वार केले. आपल्या मोठ्या भावाला वाचवण्यासाठी राकेश जाधव धावून आला असता, नराधम बंडूने त्याच्या पोटावरही सपासप वार केले.
मृत्यूशी झुंज अपयशी
हा हल्ला इतका भीषण होता की, गौरवचा कोथळा बाहेर आला होता. अशाही गंभीर परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गौरवने हाताने जखम दाबून धरत हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. त्याला तातडीने नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते, मात्र वाटेतच प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली. जखमी राकेशवर सध्या उपचार सुरू आहेत.
advertisement
हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त
मयत गौरव जाधव हा मुसळगाव एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. गौरवच्या मागे त्याची गर्भवती पत्नी, चार वर्षांची चिमुरडी, जखमी भाऊ आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. एका किरकोळ वादामुळे चिमुरडीचं पितृछत्र हरवलं असून, या घटनेमुळे जाधव कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे.
घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत संशयित आरोपी बंडू जाधवला रात्रीच ताब्यात घेतलं आहे. रथाच्या मिरवणुकीच्या आनंदाला या घटनेमुळे गालबोट लागले असून, शहरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 7:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
चाकुने वार झाले, कोथळा पकडून धावत होता तरुण पण.., नाशिकमध्ये रामरथ मिरवणुकीत रक्तरंजित कांड









