महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही, महाराष्ट्रात याठिकाणी देशातील असं एकमेव मंदिर, संपूर्ण आख्यायिका काय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
पुराणात असे म्हटले जाते की, भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते. हे देशातील पहिले मंदिर आहे इथे नंदी महाराज शंकराच्या पिंडी समोर नाही. जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा महादेवांच्या समोर पाहायला मिळत असतो
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : नाशिक शहरात प्रसिद्ध ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. हे मंदिर पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या काठावर आहे. पुराणात असे म्हटले जाते की, भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते. इथे नंदी महाराज शंकराच्या पिंडी समोर नाही, असे हे देशातील पहिले मंदिर आहे.
जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा महादेवांच्या समोर पाहायला मिळत असतो. नंदी हा जरी महादेवांचे वाहन समजला जात असला, तरी नाशिकच्या एका मंदिरात मात्र महादेवांच्या पिंडीसमोर नंदीच नाही. महादेवांनी याठिकाणी नंदीला आपला गुरु मानले आहे. याठिकाणी नेमकी आख्यायिका काय आहे याचबाबत घेतलेला हा विशेष आढावा.
advertisement
एका कपालेश्वर महादेवाच्या दर्शनाने 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य मिळते, असा पौराणिक संदर्भ सापडतो. नाशिकच्या या कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावणातल्या सोमवारी तसेच, शनिवार आणि प्रदोषाच्या दिवशी महादेवांची पालखी काढली जाते. महादेवांच्या या कपालिक पिंडीचं दर्शन घेतल्यास सर्वपातकांचा नाश होतो, अशी धारणा आहे.
advertisement
याठिकाणी नंदी महाराज का नाही -
पुराणानुसार, एकदा इंद्रसभा भरली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव व महेश यात वादविवाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असणाऱ्या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद म्हणत, तर पाचवे तोंड निंदा करीत असे. संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांडभर फिरत होते.
advertisement
एकदा सोमेश्वर येथे बसले असता, समोरच एक गाय व तिचा गोऱ्हा (नंदी) एका ब्राह्मणाच्या दारात उभा होता. त्यांच्या संवादात गोऱ्हा म्हणाला की, मी नाकात वेसण घालणार नाही, उद्या तो ब्राम्हण मला वेसण घालायला आल्यावर मी त्याला मारणार. त्यावर त्या गायीने त्यास म्हटले की, तू हे केलेस तर तुला ब्रह्महत्येचे पातक लागेल. त्यावर नंदी म्हणाला की, मला त्यावरचा उपाय माहीत आहे. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण नंदीला वेसण घालायला आला असताना, नंदीने त्याला शिंगाने हुसकले. त्यात त्या ब्राह्मणाला मृत्यू आला आणि नंदीचे शरीर काळे ठिक्कर पडले. आता पुढे काय होतं हे उत्सुकतेने पाहत शंकर त्या नंदीच्या मागे जाऊ लागले. त्यानंतर त्या नंदीने गोदावरीच्या पात्रातील (रामकुंड) त्रिवेणी संगमावर (अरुणासंगम) येऊन स्नान केले. त्याबरोबर त्याचा मूळ रंग त्याला परत मिळाला. ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले आणि हाताला चिकटलेल्या मस्तकापासून भगवान शंकराची सुटका झाली, अशी आख्यायिक सांगितली जाते.
advertisement
विश्व भ्रमण दिंडीचे आयोजन, मलेशियात घुमला हरीनामाचा गजर, डोळे दिपवणारा सोहळा, VIDEO
गोदावरी काठावर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात शंकर जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. त्यावर तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली, त्यामुळे तुला माझ्यापुढे बसण्याची गरज नाही, तू गुरुसमान आहेस, असे शंकराने नंदीस सांगितले. त्यामुळे शंकराच्या या मंदिरात नंदी नाही. जगातील हे असे एकमेव मंदिर आहे. तो नंदी रामकुंडात (गोदावरीतच) विसावला आहे, असेही मानले जाते. त्यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार 12 ज्योर्तिलिंगानंतर 'कपालेश्वर' मंदिराचं महत्त्व आहे, असे सांगितले जाते.
advertisement
सूचना - ही माहिती ज्योतिष, आचार्यांशी साधलेल्या संवादावर लिहिलेली आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
August 02, 2024 1:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही, महाराष्ट्रात याठिकाणी देशातील असं एकमेव मंदिर, संपूर्ण आख्यायिका काय?

