Kaas Plateau: कास पठाराची भ्रमंती होणार सोपी! पर्यटकांच्या सोयीसाठी वन विभागाचा मोठा निर्णय
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Kaas Plateau: कास पठार हे पर्यावरणप्रेमी, अभ्यासक आणि पर्यटकांसाठी एक खास ठिकाण आहे.
सातारा: महाराष्ट्राचं वैभव असलेलं कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरून केलं आहे. या पठारावर लाखो फुलं फुलली आहेत. हा निसर्गाचा अलौकिक नजारा पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक कासला भेट देत आहेत. पठाराचा विस्तार मोठा असल्याने पर्यटकांना पायीच सगळा परिसर फिरावा लागतो. आता या पर्यटकांसाठी वन विभाग आणि कास समितीमार्फत लवकरच 4 नवीन इलेक्ट्रिक वाहनांची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वन विभाग आणि कास समितीच्यावतीने 4 वाहनांची खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एका वाहनात 8 ते 10 प्रवासी बसू शकतात. या वाहनांच्या मदतीने राजमार्गावरील कार्यालय ते कुमुदिनीच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुमुदिनी तलावापर्यंत पर्यटकांची ने-आण होणार आहे. कुमुदिनी तलाव हा मुख्य रस्त्यापासून तीन ते चार किलोमीटर दूर आहे. तिथे पर्यटकांना पायी चालत जावे लागते. एवढे अंतर चालत जावून माघारी येणे महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ पर्यटकांना कठीण जाते.
advertisement
राजमार्ग ते कुमुदिनी तलाव हा परिसर आतापर्यंत वाहनांपासून मुक्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा परिसर प्रदूषणमुक्त आहे. याच मार्गावर कास समितीच्यावतीने नुकतीच बैलगाडीची सफर सुरू करण्यात आली आहे. जांभ्या दगडाचा असणारा हा रस्ता कच्चा असून, या मार्गावर मजबूत वाहनांची गरज होती. याच मार्गावर आता इलेक्ट्रिक वाहनं धावणार आहेत.
advertisement
कास पठारावर सध्या पिवळी, जांभळी, गुलाबी आणि निळी अशा विविध रंगांची फुले फुलली आहेत. यामध्ये करवी, सोनकी, टॉपली करवी, पांढरी बकुळी आणि अबोली अशा अनेक दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे. या पठारावर एकूण 850 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती आढळतात, त्यापैकी काही फक्त याच ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे हे पठार पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांसाठी एक खास ठिकाण आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
October 02, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kaas Plateau: कास पठाराची भ्रमंती होणार सोपी! पर्यटकांच्या सोयीसाठी वन विभागाचा मोठा निर्णय