PM Modi On BMC: २८४३ किमीवरून पीएम मोदींची बीएमसी विजयावर प्रतिक्रिया, ठाकरेंऐवजी कोणावर साधला निशाणा?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
PM Modi On BMC Election Results: मुंबई महापालिकेत भाजप महायुतीने दमदार यश मिळवत बहुमत गाठले. भाजपच्या यशावर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेत भाजप महायुतीने दमदार यश मिळवत बहुमत गाठले. भाजपच्या यशावर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे. मुंबई, महाराष्ट्रात भाजपच्या विकासाला जनतेने मान्य केले असून मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेला भाजपला यश मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले. आसाममधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या यशाबद्दल कौतुक केले. यावेळी त्यांनी ठाकरेंऐवजी थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला.
काझीरंगा येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "देशभरातील अलीकडील निवडणुकांचे निकाल हे स्पष्ट संकेत आहेत की जनतेचा काँग्रेसच्या 'नकारात्मक राजकारणा'वरचा विश्वास उडाला आहे. आजचा मतदार केवळ घोषणांवर नाही, तर सुशासन, विकास आणि आपल्या सांस्कृतिक वारशावर विश्वास ठेवणाऱ्या भाजपला पसंती देत आहे," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर तोफ डागली.
advertisement
मुंबईतील 'ऐतिहासिक' निकालाचा विशेष उल्लेख
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबई महानगरपालिका आणि इतर शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. "जगातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबईत जनतेने भाजपला ऐतिहासिक कौल दिला आहे. ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, त्याच शहरात आज तो पक्ष चौथ्या-पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे," असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्रातील या विजयाने भाजपची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.
advertisement
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर बिहार विधानसभा निवडणुकीतही पक्षाने दोन दशकांनंतर विक्रमी जागा जिंकल्याचे मोदींनी सांगितले. जनतेचा हा सातत्यपूर्ण विश्वास भाजपच्या विकासाच्या राजकारणाची पावती असल्याचे त्यांनी म्हटले.
आसामसाठी विकास प्रकल्प...
काझीरंगा येथे ६,९५० कोटींच्या विकासकामांचा धमाका राजकीय भाषणासोबतच पंतप्रधानांनी आसामच्या विकासासाठी मोठी भेट दिली. नागाव जिल्ह्यातील कालियाबोर येथे त्यांनी ६,९५० कोटी रुपयांच्या 'काझीरंगा उन्नत कॉरिडॉर' प्रकल्पाचे भूमिपूजन केले. ८६ किमी लांबीचा हा कॉरिडॉर वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, दोन नवीन 'अमृत भारत एक्सप्रेस' गाड्यांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यामुळे ईशान्य भारताची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत केली.
advertisement
काझीरंगाचे सौंदर्य आणि वन्यजीव प्रेम
पंतप्रधानांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील आपल्या मुक्कामाचा अनुभवही सांगितला. "हत्ती सफारीदरम्यान मी या निसर्गाचे सौंदर्य जवळून अनुभवले. आसाममध्ये आल्यावर मला नेहमीच एक वेगळी ऊर्जा मिळते," असे सांगत त्यांनी वन्यजीव संरक्षण आणि पर्यटन विकासावर भाष्य केले.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 1:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PM Modi On BMC: २८४३ किमीवरून पीएम मोदींची बीएमसी विजयावर प्रतिक्रिया, ठाकरेंऐवजी कोणावर साधला निशाणा?








