राहुल गांधींवर वारंवार टीका, प्रियांका गांधी यांचे शिर्डीतून मोदी शाहांना चॅलेंज
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा संपन्न झाली.
शिर्डी, अहमदनगर : राहुल गांधी हे आरक्षणविरोधी आहेत. ओबीसी समुदायाचे आरक्षण काढून त्यांना अल्पसंख्याक (मुस्लीम) समाजाला आरक्षण द्यायचे आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. विदेशात जाऊन राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी सूळ आळवला असे सांगून काँग्रेस पक्ष हा आरक्षणाचा मारेकरी आहे, असे प्रचार भारतीय जनता पक्ष करीत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने संविधान आणि आरक्षणावरून बहुतांशी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा संपन्न झाली. या सभेला ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, राष्ट्रवादी नेते आणि उमेदवार संदीप वर्पे आदी नेते उपस्थित होते.
राहुल गांधी आरक्षणविरोधी आहेत, या भाजपच्या प्रचाराचा प्रियांका गांधी यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, भाजप आणि महायुतीचे लोक मंचावरून काहीही बोलतात.जनतेची दिशाभूल करतात. राहुल गांधी हे आरक्षणविरोधी आहेत, असे सांगतात. ज्या माणसाने काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मणिपूरपासून मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढली. जनतेच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवला, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या माणसाला तुम्ही आरक्षणविरोधी म्हणता. जनतेची दिशाभूल का आणि कशाकरिता करता? असे प्रियांका यांनी विचारले.
advertisement
माझे मोदी-शाह यांना आव्हान आहे की तुम्ही मंचावरून उभे राहून सांगा की सत्तेत आल्यावर आम्ही जातिगणना करू, आरक्षणाची मर्यादा हटवू... आहे तुमच्यात हिम्मत..? असे खुले आव्हान प्रियांका गांधी यांनी दिले.
प्रियांका गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे पुरोगामित्व अधोरेखित केले. महाराष्ट्रात आल्यावर खरोखर वाटते की ही क्रांतीची भूमी आहे. शाहू-फुले आंबेडकरांची भूमी आहे.या भूमीच्या कणाकणात समानता, मानवता आहे. राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल यांच्यासारखे क्रांतीकारक इथेच घडले. महाराष्ट्राची धरती ही कधीच धार्मिक कट्टरतेला प्रोत्साहन देत नाही. इथली भूमीच्या कणाकणात समानता आहे. संत तुकाराम म्हणायचे, जे का रंजले गांजले, ज्यासी म्हणे जो आपुले. तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा... गावागावात मंदिरात जाऊन झाडू मारणारे आणि प्रेम करायला शिकविणारे, सत्याच्या वाटेवर चालायला लावणारे संत गाडगेबाबा, टिळक-काका कालेलकर-गोखले, भाऊसाहेब थोरात यांच्यासारख्या क्रांतीकारकांनी इथेच स्वातंत्र्याची लढाई लढली, या सगळ्यांना मी सादर प्रमाण करते, असे प्रियांका म्हणाल्या.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 16, 2024 3:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राहुल गांधींवर वारंवार टीका, प्रियांका गांधी यांचे शिर्डीतून मोदी शाहांना चॅलेंज