अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याचं 'भूत' पुन्हा मानगुटीवर, भाजपकडून जोरदार हल्ला, वातावरण तापलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राज्याच्या राजकारणात गाजलेला सिंचन घोटाळा पुन्हा चर्चेत आलाय. ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते त्या अजित पवारांनी याच मुद्यावरून भाजपला डिवचलं.
पुणे : सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी पुढच्या काही दिवसांसाठी एकमेकांचे विरोधक असणार आहेत. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोघे एकमेकांच्याविरोधात लढताहेत. त्यामुळे त्यांना एकमेकांवर टीका करावीच लागणार आहे. भाजपनं अजित पवारांच्या गुंडांच्या टोळ्यांना दिलेली तिकीटं काढली तर अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप काढून भाजपवर बोचरा वार केलाय.
राज्याच्या राजकारणात गाजलेला सिंचन घोटाळा पुन्हा चर्चेत आलाय. ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते त्या अजित पवारांनी याच मुद्यावरून भाजपला डिवचलं. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना, 'अडचण होईल' असा इशारा इशारा दिलाय.
भाजपच्या नेत्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना जेलमध्ये टाकू असं वक्तव्य जाहीर सभांमध्ये केलं होतं. इतकंच नव्हे तर सिंचन घोटाळ्यांची बैलगाडीभर कागदपत्रे भाजपनं चितळे समितीचे माधवराव चितळे यांच्याकडे सादर केली होते. पुराव्यांच्या 4 बॅगा बैलगाडीतून नेण्यात आल्या होत्या. मात्र ज्यांनी बैलगाडीभर पुरावे दिले त्याच भाजप नेत्यांसोबत अजित पवार आता सत्तेत आहेत. मागील तीन वर्षांपासून अजित पवार सत्तेत आहेत.
advertisement
सर्वात आधी 2 जुलै 2023 रोजी अजित पवार एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्याच सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. तर 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी भाजपवर थेट हल्लाबोल केलाय. ज्यांनी माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय. एवढ्यावरच अजित पवार थांबले नाही तर, भाजपची राक्षसी भूक शहरातली परिस्थिती बिघडवत असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. कुत्र्यांच्या नसबंदीत पैसे खाल्ले. मिळेत तिथे पैसे खायचा सपाटा लावला. सत्तेचा माज आल्यामुळे अशी कामं करतात, असा घणाघात अजित पवारांनी केला.
advertisement
सिंचन घोटाळा नेमका काय होता?
1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांची सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच इकोनॉमिक सर्व्हे मध्ये नोंदवलं होतं. अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचं CAGनं म्हटलं होतं. 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं CAG नं म्हटलं होतं. 12 प्रकल्पांची सात महिन्यात दुपटीने वाढली होती. माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या गौप्यस्फोटानं अजित पवार अडचणीत आले होते.
advertisement
मात्र सिंचन घोटाळ्याच्या काही प्रकरणात अजित पवारांनी क्लीनचिटही मिळाली होती. आता सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा समाचार घेत भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद चव्हाण यांनी जोरदार पलटवार केला. आम्ही आरोप केले तर अजितदादांची अडचण होईल, असे चव्हाण म्हणाले.
रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांवर तोफ डागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनीही फिल्मी स्टाईलनं डायलॉगबाजी करत उत्तर दिलं. डायलॉगबाजी करू नका, व्यवस्थित बोला, असे मिटकरी म्हणाले.
advertisement
भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून महायुतीतील घटक पक्षच आपसात लढायला लागले. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही रणांगणात उडी घेतली. सिंचन घोटाळ्याचं काय झालं? पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बाबत माहिती द्यावी, असं आव्हानच संजय राऊतांनी दिलं.
विरोधकांच्या हाती आयता मुद्दा दिल्यामुळे सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून अजित पवारांनी ऐन प्रचारात सेल्फ गोल तर केला नाही ना, अशीही चर्चा आता सुरू झालीय. मात्र अजित पवारांनी एक प्रकारे त्यांचं मूल्यही दाखवून दिलंय. कारण अजित पवारांवर आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही अजित पवार होते. अजित पवार निधी देत नाहीत, शिवसेना संपवायला निघालेत असा आरोप करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते. आणि सिंचन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे अजित पवारांची कोणती राजकीय अडचण होईल? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 9:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याचं 'भूत' पुन्हा मानगुटीवर, भाजपकडून जोरदार हल्ला, वातावरण तापलं











